Maharashtra Cabinet : तारीख ठरली नाही पण मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, आमच्या घडामोडीही सुरु, राजधानी दिल्लीत फडणवीसांचा दावा

आमच्या घडामोडी आमच्या चाललेल्या आहेत, त्यामुळे लवकरच विस्तार करु. सुप्रीम कोर्टचा (Supreme Court) याच्याशी काही संबंध नाही. उलट सुप्रीम कोर्टात आमची केस अतिशय मजबूत आहे. त्याचा आणि याचा काही संबंध नाही, असं फडणवीस म्हणाले.

Maharashtra Cabinet : तारीख ठरली नाही पण मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, आमच्या घडामोडीही सुरु, राजधानी दिल्लीत फडणवीसांचा दावा
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 22, 2022 | 11:27 PM

नवी दिल्ली : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन होऊन 20 दिवस उलटून गेले. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहू्र्त लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराबाबत विचारलं असता, ‘अजून तारीख ठरलेली नाही, पण मला असं वाटतं की आता लवकरात लवकर हा विस्तार होईल. त्याबाबतच्या घडामोडी आमच्या चाललेल्या आहेत, त्यामुळे लवकरच विस्तार करु. सुप्रीम कोर्टचा (Supreme Court) याच्याशी काही संबंध नाही. उलट सुप्रीम कोर्टात आमची केस अतिशय मजबूत आहे. त्याचा आणि याचा काही संबंध नाही’, असं फडणवीस म्हणाले.

दिल्लीतील घडामोडीबाबत सांगताना फडणवीस म्हणाले की, मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निरोप आणि नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं स्वागत अशा प्रकारचं एक डिनर आज पंतप्रधान मोदींनी प्रथेप्रमाणे आयोजित केलं होतं. त्याचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं. तिथे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट झाली. मात्र त्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. तसंच देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्याबाबत विचारल्यानंतर सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मोठ्यांनी आशीर्वाद दिले. पंतप्रधानसाहेबांनी आशीर्वाद दिला. शेवटी शुभेच्छा तर त्यांच्या आहेतच, असं फडणवीस म्हणाले.

‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत मिळेल’

राज्यातील पूरस्थितीबाबत फडणवीसांना प्रश्न विचारला. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यात पंचनामे सुरु झाले आहेत. मी काही भागात जाऊन आलोय. त्याठिकाणची पाहणी मी केली. ज्यांचं नुकसान झालं त्या सगळ्यांना निश्चितपणे मदत मिळेल, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलंय.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

राष्ट्रपतींच्या विजयानंतर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे जेवण होतं. त्या ठिकाणी सर्वच भेटले. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असं शिंदे यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टातील सुनावणीसाठी थांबला आहात का? असा प्रश्न विचारला असता, असं काहीच नाही, सुप्रीम कोर्टाने असं काही सांगितलेलं नाही. सुप्रीम कोर्टाचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काही संबंध नाही आणि कुठल्याही कामकाजावर सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला नाही. त्यामुळे तो विषय नाही, आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करू, असं शिंदेंनी स्पष्ट केलं. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्रिपदाच्या यादीवर चर्चा करायची असतील तर मुंबईत होईल ती दिल्लीत कशाला होईल, असेही शिंदे म्हणाले.