चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक: बक्षिसाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी राष्ट्रवादीच्या १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ११ पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

बारामती : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेकीची घटना शनिवारी पिंपरी या ठिकाणी घडली. या घटनेनंतर 11 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर शाईफेकीवर बक्षिसाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर ही शाईफेक करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली होती. पण तरी देखील त्यांच्यावर शाईहल्ला करण्यात आला. यावर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ
शाईफेकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर गृहखात्याने त्यांच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसांवर कारवाई केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांवर कारवाई करु नये असं आवाहन काल केलं होतं. पण तरी देखील आज या पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.
राज्यभरात भाजपची निदर्शनं
पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरा चंद्राकांत पाटील यांच्या समर्थनार्थ भाजपनं आंदोलन केलं. मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.कोल्हापूर, ठाणे सह राज्यातील अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचा निषेध केला आहे.
पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
‘चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली तरी त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. हे चांगल्या संस्कृतीचे लक्षण नाही. माफी मागितली तर माफ केलं पाहिजे.’ असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
