11 वेळा आमदार, 95 वर्षीय गणपतराव देशमुखांच्या भेटीला चंद्रकांत पाटील, कारण…

| Updated on: Nov 26, 2020 | 1:43 PM

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने चंद्रकांतदादांनी गणपतराव देशमुखांची भेट घेतली

11 वेळा आमदार, 95 वर्षीय गणपतराव देशमुखांच्या भेटीला चंद्रकांत पाटील, कारण...
Follow us on

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांची भेट घेतली. देशमुख यांच्या सोलापुरातील सांगोला येथील निवासस्थानी ही भेट झाली. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी ही भेट घेतली. (Chandrakant Patil meets 95 years old Former MLA Ganpatrao Deshmukh in Sangola)

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादीचे अरुण लाड (Arun Lad), भाजपचे संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. 95 वर्षांच्या तरुणाची क्रेझ आजही सांगोला मतदारसंघात आहे. त्यामुळे आबासाहेबांच्या समर्थकांचं पाठबळ मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे.

कोण आहेत गणपतराव देशमुख?

आमदार गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विश्वविक्रम रचला आहे. सांगोला विधानसभा निवडणुकीत 94 हजार 374 मतं मिळवत गेल्या वेळी त्यांनी एकहाती विजय साकारला होता. आमदार देशमुख 54 वर्ष सातत्याने निवडून येत होते.

देशमुख 1962 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता, ते सातत्याने विजयी झाले आहेत. गणपतरावांच्या या विजयामुळे शेतकरी कामगार पक्षाची ताकद सांगोला मतदारसंघात मोठी आहे.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी दहा वेळा विजयी झाले होते. 2009 च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. 2014 मध्ये त्यांनी हा विक्रम मोडित एकमेवाद्वितीय होण्याचा मान पटकावला.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता. (Chandrakant Patil meets 95 years old Former MLA Ganpatrao Deshmukh in Sangola)

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

एक पक्ष एक व्यक्ती एक मतदारसंघ म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते आणि याच मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख हे विजयी होत आलेले आहेत. सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

संबंधित बातम्या :

पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत

आबासाहेब फिरसे, 94 वर्षीय आमदार गणपतराव देशमुखांसाठी मतदारांचा नारा

(Chandrakant Patil meets 95 years old Former MLA Ganpatrao Deshmukh in Sangola)