तुम्ही वर्क फ्रॉम होम करायचे, आम्ही वर्क विदाऊट होम करायचो; एकनाथ शिंदे यांचा घणाघात

| Updated on: Oct 05, 2022 | 10:01 PM

कोविड काळात आम्ही पीपीई कीट घालून लोकांमध्ये गेलो. जीवाची पर्वा केली नाही. सर्वांना मदत केली. पूराच्या पाण्यातून गेलो. मीच नाही, असंख्य शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घातला.

तुम्ही वर्क फ्रॉम होम करायचे, आम्ही वर्क विदाऊट होम करायचो; एकनाथ शिंदे यांचा घणाघात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : गद्दार म्हणून हिणवणाऱ्या उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयोजित दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोरोना काळातील कामकाजावरुन उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackarey) जोरदार निशाणा साधला. तुम्ही वर्क फ्रॉम होम (Work from Home) करत होता. आम्ही होम विदाऊट वर्क करत होतो. घर दार सोडून काम करत होतो, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.

कोविड काळात असंख्य शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घातला

कोविड काळात आम्ही पीपीई कीट घालून लोकांमध्ये गेलो. जीवाची पर्वा केली नाही. सर्वांना मदत केली. पूराच्या पाण्यातून गेलो. मीच नाही, असंख्य शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घातला. अनेक पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

तुम्ही त्याची दखल घेणार की नाही, असं असताना तुम्ही कुणाला सांभाळलं. असं असल्यावर बाळासाहेब शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहायचे. तुम्ही कुणाला सांभाळलं. तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीला उभं केलं.

बाळासाहेबांना साथ देणाऱ्या थापाचीही चेष्टा केली

इथे स्मिता वहिनी आहेत. मी जेव्हा निर्णय घेतला, तेव्हा मला घरच्यांचा फोन आला. चांगला निर्णय घेतला. या थापाने बाळासाहेबांना साथ दिली. त्यानेही तुम्हाला सोडलं. तुम्ही त्याची चेष्टा केली.

लादी पुसणारा, बाथरूम साफ करणारा…काय काय तुम्हाला म्हणायचे काय. बाळासाहेब या लोकांना सवंगडी समजायचे. तुम्ही त्यांना घरगडी म्हणायचे.

सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली

शिवसेनेला तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी शिवसैनिकांनी रक्त सांडलं. मात्र तुम्ही सत्तेच्या हव्यासासाठी स्वाभिमान गहाण ठेवला. ज्या पक्षांबाबत बाळासाहेब हरामखोर असा उल्लेख करायचे, वैयक्तीक स्वार्थासाठी तुम्ही त्यांच्या दावणीला शिवसेना बांधली.

आम्ही जे केलं ते जनतेच्या हितासाठी केलं. तीन महिन्यांपासून राज्यात फिरतोय. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आम्ही बेईमानी केली असती तर तुम्ही एवढ्या संख्येने आला असता का? हा प्रेमाचा वर्षाव आहे, असे शिंदे म्हणाले.