Eknath Shinde : राज्याचे ठाणेदार एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात जनगौरव; 13 ऑगस्टला भव्य सत्कार सोहळा

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वेळापत्रकातील बदलामुळे जनगौरव सोहळ्याच्या तारखेत बदल करावा लागला आहे. आता जनगौरव सोहळा 13 ऑगस्ट रोजी संपन्न होईल. कार्यक्रमाचे नियोजन अधिक काटेकोरपणे करण्यासाठी आम्हाला वेळ मिळाला आहे.

Eknath Shinde : राज्याचे ठाणेदार एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात जनगौरव; 13 ऑगस्टला भव्य सत्कार सोहळा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 26, 2022 | 6:33 PM

ठाणे: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राच्या (maharashtra) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचा ठाण्यात भव्य सत्कार करण्यात येणार आहे. ठाण्यातील विविध क्षेत्रांमधील सेवाभावी संस्थांनी एकत्र येत योजलेला त्यांचा नागरी जनगौरव सोहळा आता 30 जुलैऐवजी 13 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे. सोमवारी, 25 जुलै रोजी ठाण्यातील (thane) आनंद विश्व गुरुकुल येथे झालेल्या मुख्यमंत्री जनगौरव समितीच्या बैठकीत जनगौरव सोहळ्याच्या नव्या तारखेची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यवेळापत्रकातील अपरिहार्य बदलामुळे जनगौरव सोहळ्याच्या नियोजित तारखेत बदल करावा लागल्याची माहिती मुख्यमंत्री जनगौरव समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष विलास ठुसे, उपाध्यक्ष कमलेश प्रधान, मीरा कोरडे, सल्लागार विद्याधर ठाणेकर, माध्यमतज्ज्ञ उदय निरगुडकर आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

ठाण्याला मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन मुख्यमंत्री जनगौरव समितीने केले आहे. या आयोजन समितीत ठाण्यातील कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी क्षेत्रांतील संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जनगौरव सोहळा 30 जुलै करण्याचे योजले होते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या कार्यवेळापत्रकात अचानक अपरिहार्य बदल झाल्याने या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोहळ्यास उपस्थित राहणे शक्य झाले नसते. यामुळे जनगौरव सोहळ्याच्या नियोजित तारखेत बदल करण्याचा निर्णय जनगौरव समितीने घेतला आहे.

आता हा जनगौरव सोहळा शनिवार, 13 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा सोहळा होणार आहे. या जनगौरव सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या नागरी सत्काराबरोबर त्यांच्यावरील गौरवगीताचे सादरीकरण, गौरवग्रंथाचे प्रकाशन आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचेही आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकट मुलाखत प्रसिद्ध माध्यमतज्ज्ञ उदय निरगुडकर हे घेणार असल्याची माहिती जनगौरव समितीने सोमवारी झालेल्या बैठकीत दिली.

मिरवणूक काढणार

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत नेण्यात येणारी मिरवणूक तसेच अन्य सुरक्षाविषयक प्रक्रियेसंदर्भात समितीचे उपाध्यक्ष कमलेश प्रधान यांनी माहिती दिली. तर गौरवग्रंथ समितीचे प्रमुख विद्याधर ठाणेकर यांनी गौरवग्रंथाच्या कामाचा आढावा सादर केला. समितीचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी प्रवेशिकांसंदर्भातील नियोजनाविषयी माहिती दिली. बैठकीचे सूत्रसंचालन अरुंधती भालेराव यांनी केले.

जनगौरव सोहळा ऐतिहासिक ठरणार

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वेळापत्रकातील बदलामुळे जनगौरव सोहळ्याच्या तारखेत बदल करावा लागला आहे. आता जनगौरव सोहळा 13 ऑगस्ट रोजी संपन्न होईल. कार्यक्रमाचे नियोजन अधिक काटेकोरपणे करण्यासाठी आम्हाला वेळ मिळाला आहे. ठाण्यातील अनेक क्षेत्रांमधील संस्था आयोजन समितीत दररोज जोडल्या जात आहेत. ठाणेकरांकडून होत असलेला हा जनगौरव सोहळा ठाण्याच्या आजवरच्या परंपरेला साजेसा असाच ऐतिहासिक ठरावा, यादृष्टीने मुख्यमंत्री जनगौरव समितीचे नियोजन सुरू आहे. यास सुजाण ठाणेकरही उत्स्फूर्त प्रतिसाद देतील व साहाय्य करतील, हा ठाम विश्वास आहे, असं प्रदीप ढवळ यांनी सांगितलं.