Abdul Sattar : आम्हाला पालापाचोळा म्हणता, तुम्हाला भाजीपाला म्हटलं तर चालेल का?; सत्तारांचा रोकडा सवाल
आतापर्यंत आमच्या विरोधात 9 याचिका टाकल्या आहेत. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेही याचिका दाखल करा. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कुणीही वापरू नये म्हणून त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असा खोचक टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला.

औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शिंदे गटाच्या सर्व बंडखोर आमदारांना पालापाचोळा म्हटलं आहे. हा पालापाचोळा कधी उडून जाईल याचा नेम नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरून शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही आम्हाला पालापाचोळा म्हणता. मग आम्ही तुम्हाला भाजीपाला म्हटलं तर चालेल का? असा सवाल माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे ही कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. ते राष्ट्रपुरुष आहेत. त्यांचं नाव कुणीही वापरू शकतो. कुणी त्यांच्या नावाला विरोध कसा करू शकतो? राष्ट्रपुरुषांची जी काही यादी आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचं नाव आहे. त्यामुळे त्यांचं नाव वापरण्यास कुणीच मज्जाव करू शकत नाही, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
आतापर्यंत आमच्या विरोधात 9 याचिका टाकल्या आहेत. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेही याचिका दाखल करा. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कुणीही वापरू नये म्हणून त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असा खोचक टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला. मातोश्रीकडे परतण्याचे माझे तरी दरवाजे मी बंद करून घेतले आहेत. मी आता मातोश्रीकडे परतणार नाही, असंही सत्तार यांनी सांगितलं.
खोतकरांनी काय तो निर्णय घ्यावा
बाळासाहेबांचे हिंदुत्व म्हणजे हे काही ठाकरे परिवाराचे प्रायव्हेट कॅरियर नाही. ते तमाम हिंदूंचे हृदयसम्राट होते, असंही ते म्हणाले. अर्जुन खोतकर हे राजकारणात कन्फ्यूज असतात. त्यांनी काय तो अंतिम निर्णय घ्यावा. रावसाहेब दानवे यांना पण मी ओळखतो या दोघांनी आता राजकीय मैत्री करायला पाहिजे. अर्जुन खोतकर हे तीन सीटवर रुमाल टाकून बसले आहेत, मात्र असं केल्यास एकही सीट मिळत नाही. त्यामुळे खोतकरांनी काय तो निर्णय घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
म्हणून मला चिंता वाटत नाही
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दैनिक सामनात प्रदीर्घ मुलाखत दिली आहे. शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर त्यांनी पहिल्यांदाच त्यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. फुटून गेलेले लोक म्हणजे सर्व पालापाचोळा आहे. हा पालापाचोळा उडून जाईल. शिवसेनेत नेहमी फूट पडली. पण त्याच जोमाने शिवसेना पुन्हा उभी राहिली आहे. शिवसेना पुन्हा जशीच्या उभी राहिली आहे. त्यामुळे मला चिंता वाटत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
