‘जिंतूर बाजार समितीचा प्रश्न मोठा नाही’, उद्धव ठाकरेंचा संजय जाधव यांना फोन, राजीनामा मागे घेण्याची सूचना

| Updated on: Aug 26, 2020 | 8:38 PM

उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना फोन करुन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे (CM Uddhav Thackeray Phone to MP Sanjay Jadhav).

जिंतूर बाजार समितीचा प्रश्न मोठा नाही, उद्धव ठाकरेंचा संजय जाधव यांना फोन, राजीनामा मागे घेण्याची सूचना
Follow us on

औरंगाबाद : परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव नाराज आहेत. या नाराजीतून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा पाठवला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना फोन करुन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे (CM Uddhav Thackeray Phone to MP Sanjay Jadhav).

उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांच्याशी फोनवर बोलताना परभणीतील स्थानिक पातळीवर पक्षाशी संबंधित काय समस्या आहेत, यावर चर्चा केली. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रश्न सोडवला जाईल. तो तितका फारसा मोठा प्रश्न नाही, अशी समजूत घालून खासदारकीचा राजीनामा मागे घेण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना दिली आहे. त्याअनुषंगाने संजय जाधव राजीनामा मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे स्वत: संजय जाधव यांना फोन करणार आहेत. पक्ष पातळीवर जी काही गळचेपी होत असेल त्यावर मार्ग काढला जाणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये संवाद होऊन मार्ग निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे (CM Uddhav Thackeray Phone to MP Sanjay Jadhav).

दरम्यान, संजय जाधव यांनी या विषयावर प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. “वरिष्ठांशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर प्रसारमाध्यांशी बोलणार”, असं संजय जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.

संजय जाधवांवर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचे गंभीर आरोप

दरम्यान, खासदार संजय जाधव यांच्यावर परभणीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुरराणी यांनी गंभीर आरोप केले आहेत. संजय जाधव हे भाजपला पोषक वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप बाबाजानी दुरराणी यांनी केला आहे. त्याचबरोबर इतक्या छोट्या विषयावरुन खासदाराला राजीनामा देणं शोभतं का? असा सवाल त्यांनी केला आहे.

संजय जाधव यांनी राजीनामा का दिला?

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, बाजार समितीत पुन्हा राष्ट्रवादीचं अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याने शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची भावना खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत बोलूनही शिवसेनेचं प्रशासक मंडळ नियुक्त न झाल्याने खासदार जाधव नाराज झाले. यातूनच त्यांनी खासदारकीचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवले. या पत्रात त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

खासदार संजय जाधव मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हणाले?

“जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी मी मागील 8 ते 10 महिन्यांपासून आपल्याकडे पाठपुरावा करीत आलो आहे. पण जिंतूरला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नसताना पहिल्यांदा त्यांचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यावेळेला पुढच्या वेळेस आपल्याला संधी मिळेल असे म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी कशी-बशी समजूत काढून तथा मी ही शांत बसलो”, असं संजय जाधव पत्रात म्हणाले.

“दरम्यानच्या काळात जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर यावेळेस तरी शिवसेनेचे प्रशासक मंडळ नियुक्त करावे, म्हणून मी आपल्याकडे सतत पाठपुरावा करीत राहिलो. मात्र याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशासक मंडळ नियुक्त केले. ही बाब माझ्या मनाला फारच खटकली असून कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. आपले सरकार असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जर मी न्याय देऊ शकत नसेल तर खासदार पदावर राहण्याचा मसा मुळीच नैतिक अधिकार नाही, असे मला वाटते”, असं संजय जाधव म्हणाले.

“शेवटी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तेव्हा कार्यकर्त्याला पदावर जाण्याची संधी आणि न्याय मिळत नसेल तर माझी खासदारकी काय कामाची? खासदार पदावर राहण्याचा मला कसलाही नैतिक अधिकार नाही. या मताचा मी आहे. शिवसैनिकांना न्याय मिळत नसेल तर संघटना कशी वाढेल?”, असा सवाल संजय जाधव यांनी उपस्थित केला.

“जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. मात्र, मी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर इतर पक्षातील लोकांना शिवसेनेत आणून काय न्याय देऊ शकेल? असा प्रश्न मला पडला आहे”, असं मत संजय जाधव यांनी पत्रात मांडलं.

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी खासदार म्हणून मी सतत पाठपुरावा करुनही दुसऱ्यांदाही राष्ट्रवादी काँग्रेसचेच प्रशासक मंडळ नियुक्त केल्याने शिवसैनिकांवर पुन:च्छ अन्याय झाला आहे. ही बाब माझ्या मनाला अत्यंत वेदना देत आहे. खासदाक म्हणून मी जर कार्यकर्त्यांना न्याय देत नसेल तर मला खासदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. तेव्हा पूर्ण विचारांती आणि राजखुशीने मी खासदार पदाचा राजीनामा आपल्याकडे देत आहे. मी शिवसैनिक म्हणून काम करेन. तरी माझा खासदारकीचा राजीनामा मंजूर करावा, ही विनंती”, असं संजय जाधव मुख्यमंत्र्यांना पाठवेलल्या पत्रात म्हणाले आहेत.

संबंधित बातमी :

राष्ट्रवादीकडून गळचेपी, शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा

संबंधित व्हिडीओ :