मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मतदासंघ निश्चित?

| Updated on: Jan 04, 2020 | 12:07 PM

धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी येत्या 24 जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मतदासंघ निश्चित?
Follow us on

मुंबई : विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या जागेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. (Uddhav Thackeray Vidhan Parishad Election) मात्र या जागेसाठी केवळ अडीच वर्षांचा कालावधी बाकी असल्यामुळे मुख्यमंत्री ही विधानपरिषदेची जागा लढवण्याबाबत अनिश्चितता आहे

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांना विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहात सहा महिन्यांच्या आत निवडून येणं अनिवार्य आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांसाठी सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी केली जात होती. मुंबईतील माहिमपासून यवतमाळपर्यंत वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांची नावं चर्चेत होती. त्यातच आता मुख्यमंत्री विधानपरिषदेवर निवडून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

येत्या 24 जानेवारीला विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात काल घोषणा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री या जागेवरुन लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे विधानसभेवर निवडून जाणार का, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र पहिल्यांदा निवडणूक लढवताना उद्धव ठाकरे विधानपरिषदेचा सोपा मार्ग निवडण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती.

राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे हे बीडमधील परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्याने बीड विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. धनंजय मुंडे यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2022 पर्यंत होती. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता महाराष्ट्र विकास आघाडीचा उमेदवार सहज जिंकून येऊ शकतो. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी ही जागा निवडल्यास त्यांची निवडणूक ही केवळ औपचारिकता असेल.

हेही वाचा : फडणवीस की ठाकरे सरकार, कोणतं सरकार भारी? डॉ. निलेश साबळे म्हणतो….

केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार या पोटनिवडणुकीची अधिसूचना येत्या 7 जानेवारीला जारी करण्यात येणार आहे. 14 जानेवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 15 जानेवारीला उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येईल. तर 17 जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास 24 जानेवारी रोजी मतदान (Uddhav Thackeray Vidhan Parishad Election) घेण्यात येईल.