कृषी कायदे, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर उपोषण, नाना पटोले, अनेक मंत्रीही उपोषणाला बसणार

| Updated on: Mar 25, 2021 | 6:40 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अन्य नेते आणि मंत्रीही मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 11 ते दुपारी 4 यावेळेत उपोषण करणार आहेत.

कृषी कायदे, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर उपोषण, नाना पटोले, अनेक मंत्रीही उपोषणाला बसणार
nana patole
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आणि इंधन दरवाढीविरोधात शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (26 मार्च) भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला कांग्रेसनं सक्रिय पाठिंबा जाहीर केलाय. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या या बंदमध्ये सहभागी होत काँग्रेस पक्षाचे नेते राज्यभर उपोषण करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अन्य नेते आणि मंत्रीही मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 11 ते दुपारी 4 यावेळेत उपोषण करणार आहेत. तशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.(Congress leader Nana Patole and Congress ministers will also take part in Bharat Band)

राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणीही काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या उपोषणात सहभागी होणार आहेत. प्रदेश कार्याध्यक्ष हे विभागाच्या मुख्यालयी उपोषणाला बसणार आहेत. औरंगाबादेत शिवाजीराव मोघे, ठाण्यात माजी मंत्री नसीम खान, नागपुरात चंद्रकांत हांडोरे, पुण्यात बसवराज पाटील, नाशिकमध्ये आमदार प्रणिती शिंदे तर अमरावतीत आमदार कुणाल पाटील हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार आहेत.

केंद्र सरकारवर गंभीर आरोप

“शेतक-यांना उद्धवस्त करणारे काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील 110 दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. तरीही हे कृषी कायदे मोदी सरकारने रद्द केले नाहीत. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. त्यामुळे गोरगरिब जनता, कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे. मात्र मनमानी मोदी सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे”, असा आरोप काँग्रेसनं केलाय.

त्याचबरोबर “पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसवर भरमसाठ कर लावून केंद्र सरकार दरोडा टाकत आहे. पेट्रोल 100 रुपये लिटर तर गॅस सिलिंडर 850 रुपये झाला आहे. महागाईनं लोकांचं जगणं कठीण होऊन बसलं आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत”. मोदी सरकारच्या या मनमानी व  हुकुमशाहीचा विरोध उपोषण करून केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आलीय.

अकोला, वाशीम जिल्ह्याची आढावा बैठक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज गांधी भवन इथं अकोला जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटी तसंच वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी उज्ज्वल करण्यासाठी पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचं आवाहनही पटोले यांनी केलं. या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान, कार्याध्यक्ष कुणाल पाटील, उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार अमित झनक, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहे का; नाना पटोलेंनी फटकारले

नाना पटोले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून कामालाही लागले? स्वबळाची भाषा

Congress leader Nana Patole and Congress ministers will also take part in Bharat Band