Rahul Gandhi : ‘आता संसदेत पीएम मोदींना समोर पाहून मी बोलू शकतो की…’ अमेरिकेत काय म्हणाले राहुल गांधी?
Rahul Gandhi : "आरएसएस तामिळ, मराठी, बंगाली आणि मणिपूर या भाषांना कमी समजते. आमची लढाई याच्याविरुद्ध आहे. आरएसएसच्या लोकांना भारत समजत नाही" अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते अमेरिकेत वर्जिनिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तीन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. ‘भाजपा आणि आरएसएस हा देश सर्वांचा आहे असं मानत नाहीत’, वर्जिनिया येथे एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं. राहुल गांधी वर्जिनीया येथे प्रवासी भारतीयांच्या सम्मेलनाला संबोधित करत होते. “आरएसएसनुसार, काही राज्य दुसऱ्या राज्यांच्या तुलनेत कमी आहेत, काही भाषा दुसऱ्या भाषांपेक्षा कमी आहेत. काही धर्म अन्य धर्मांच्या तुलनेत कमी आहेत. काही समुदाय दुसऱ्या समुदायापेक्षा कमी आहेत” असं राहुल गांधी म्हणाले.
“आरएसएस तामिळ, मराठी, बंगाली आणि मणिपूर या भाषांना कमी समजते. आमची लढाई याच्याविरुद्ध आहे. आरएसएसच्या लोकांना भारत समजत नाही. आम्ही असा विचार करतो की, तुम्ही पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र किंवा कुठल्याही राज्याचे असाल, तुमचा स्वत:चा इतिहास, परंपरा आणि भाषा आहे. प्रत्येकाचं समान महत्त्व आहे” असं राहुल गांधी म्हणाले. “लोकसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवण्यात आली. त्यानंतर आम्ही विचार केला की, काय केलं पाहिजे. त्या परिस्थितीतही आम्ही निवडणूक लढलो” असं राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान मोदींना समोर पाहून बोलू शकतो की…
“निवडणुकीनंतर काही लोक म्हणाले की, आता भिती वाटत नाही. भिती निघून गेली. भाजपा आणि पंतप्रधान मोदींनी भिती निर्माण केली होती. काही सेकंदात ही भिती निघून गेली. त्यांना ही भिती निर्माण करण्यासाठी अनेक वर्ष लागली. पण काही सेकंदात ही भिती पळून गेली. संसदेत पंतप्रधान मोदींना समोर पाहून बोलू शकतो की, मोदीजी 56 इंचाची छाती, ईश्वराशी थेट संबंध असण्याचा दावा आता या सर्व गोष्टी इतिहास जमा झाल्या आहेत” अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली.
‘ते यूनियन ऑफ स्टेट्स मानत नाहीत’
“हा देश सर्वांचा आहे हे भाजपाला समजत नाही. हा देश मिळून बनलाय. याला यूनियन ऑफ स्टेट म्हटलं जातं. संविधानात हे स्पष्टपणे लिहिलय. इंडिया दॅट इज भारत इज अ यूनियन स्टेट. याचा अर्थ यूनियन ऑफ स्टेट्स, यूनियन ऑफ लॅग्वेज आणि यूनियन ऑफ हिस्ट्री होतो. पण ते म्हणतात, भारतात युनियन नाहीय. हे सगळं वेग-वेगळं आहे. यातल्या एका महत्त्वाच्या गोष्टीच हेडक्वार्टर नागपुरात आहे” असं राहुल गांधी म्हणाले.