संघाच्या हाफ चड्डीला आग, काँग्रेसच्या ‘त्या’ ट्विटने वाद वाढणार?

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. या काळात भाजप आणि काँग्रेसमध्ये एकानंतर एक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच भाजपावर वार करत काँग्रेसनं एक ट्विट केलंय. या ट्विटने भाजपची संतप्त प्रतिक्रिया आली आहे.

संघाच्या हाफ चड्डीला आग, काँग्रेसच्या त्या ट्विटने वाद वाढणार?
भाजप नेते संबित पात्रा यांची काँग्रेसच्या ट्विटवर जोरदार टीका
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Sep 12, 2022 | 2:58 PM

नवी दिल्लीः राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसने एक ट्वीट जारी केलंय. काँग्रेसच्या यात्रेमुळे भाजपला मोठं नुकसान भोगावं लागणार, असा इशारा दिला जातोय. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील हाफ चड्डीचं एक छायाचित्र काँग्रेसने ट्विट केलंय. या हाफचड्डीला आग लागल्याचं या ट्विटमध्ये दर्शवलंय. तसंच आता फक्त145 दिवस… असा इशाराही या ट्विटवर देण्यात आलाय. या ट्विटवरून भाजप नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू शकतात. उत्तर प्रदेशातील नेत्याने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसचे ट्विट काय?

भाजप आणि आरएसएसने देशाचं केलेलं नुकसान आणि तिरस्काराच्या भावनेतून मुक्त करण्यासाठी काँग्रेस एक-एक पाऊल पुढे टाकतेय… असे म्हणत काँग्रेसने संघाच्या हाफ चड्डीचा फोटो ट्विट केलाय.

उत्तर प्रदेश मंत्र्याचे ट्विट काय?

काँग्रेसच्या या ट्विटवर उत्तर प्रदेशातील सार्वजनिक बांधकाम मंत्री जितिन प्रसाद यांची प्रतिक्रिया आली आहे. राजकीय मतभेद स्वाभाविक आणि समजण्याजोगे आहेत. मात्र राजकीय विरोधकांना जाळण्यासाठी अशा प्रकारची मानसिकता काय कामाची? नकारात्मकता आणि द्वेषाच्या राजकारणाची सर्वांनीच निंदा केली पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केलंय.

संघाची आता फुल पँट

काँग्रेसने संघाच्या जुन्या गणवेशातील हाफ पँटचा फोटो ट्विट केला आहे. मात्र सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश बदलला आहे. हाफ पँट ऐवजी फुल पँट करण्यात आली आहे. रंग तोच खाकी आहे. 2016 मधील विजयादशमीला हा बदल करण्यात आलाय.

भाजपने देशात दुफळी माजवल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. तर राहुल गांधी देशभरात यात्रेद्वारे भारतीयांची मनं जोडण्याचं काम करत असल्याचं काँग्रेसने म्हटलंय.

भारत जोडो यात्र भाजपच्या विनाशकारी राजकारणाविरोधात आहे. एवढंच नाही तर स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत काँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी भारत जोडो यात्रा प्रभावी ठरेल, असं वक्तव्य काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केलंय.

तर ज्यांनी देश तोडण्याचं काम केलं, तेच अशा प्रकारच्या यात्रांचं आयोजन करत आहे, अशा शब्दात भाजपचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे.