शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणूक लढणार

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा श्रीपाद छिंदम पुन्हा निवडणूक लढणार

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिकेची निवडणूक लढणार आहे. अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेत छिंदमने प्रभाग क्रमांक नऊमधून निवडणूक लढण्यासाठी अर्ज दाखल केला. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळल्यानंतर भाजपमधून आणि पदावरुन छिंदमची हकालपट्टी करण्यात आली होती.

शिवजयंतीच्या तोंडावर महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याशी कामासंदर्भात फोनवरुन बोलताना, छिंदमने शिवराय आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून छिंदमबद्दल संताप व्यक्त केला गेला. यानंतर छिंदमवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र तो जामिनावर बाहेर आला.

छिंदमला कोणताही पक्ष तिकीट देणार नाही हे निश्चित होतं. तरीही त्याने प्रभाग क्रमांक 9 आणि 13 मधून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आता त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

छिंदममुळे भाजप आणि खासदार दिलीप गांधी अडचणीत आले होते. मात्र पुन्हा छिंदमने उमेदवारी अर्ज घेतल्याने आता राजकारण तापू लागलंय. छिंदमला खासदार गांधींचाच पाठिंबा आल्याच्या चर्चा शहरात सुरु आहेत. तर यावरून अनेक शिवप्रेमी नाराज असल्याच दिसतंय. एकंदरीत पुन्हा भाजपची अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारती येत नाही. तर विरोधकांनीही भाजपला कोंडीत पकडलंय.

आता छिंदम ज्या प्रभागातून लढणार आहे, तिथून भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागलं आहे.

राज्यात 9 डिसेंबर रोजी नगर आणि धुळे महापालिकेसाठी मतदान होणार आहे. तर 10 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. अहमदनगरमध्ये 17 प्रभागातील 68 जागांसाठी ही निवडणूक होत असून 13 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

संबंधित बातमी : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा छिंदम निवडणुकीच्या मैदानात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI