
गोंदिया | प्रतिनिधी, 20 मार्च 2024 : एकीकडे लोकसभा निवडणूकांचे बिगुल फुंकले गेले आहे. सगळ्या पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यातच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषयाचे भिजत घोंगडे कायम आहे. गेल्या नऊ वर्षांपासून नगर परिषद स्थापनेचा हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. नागरिकांनीच हा विषय आता हातात घेऊन नगर परिषद संघर्ष समिती स्थापन केली आहे. नगर परिषद संघर्ष समितीच्या माध्यमाने निर्धार करून सरळ देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
बिरसी गावात महिलांच्या पुढाकाराने ‘माझा गाव, माझा बहिष्कार’, अशा घोषणा देत आठ गावातील नागरिकांनी सरकार विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. आमगाव नगर परिषद संघर्ष समितीच्या माध्यमातून नगर परिषद स्थापनेचे न्यायप्रविष्ठ प्रकरण राज्य सरकारने निकाली काढावे यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. यासाठी अनेक मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली. तरीही राज्य सरकारने हे प्रकरण निकाली काढण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. लोकप्रतिनिधींनी देखील या प्रकरणात अनेकदा थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु राज्य सरकारने नगर परिषद स्थापनेचा विषय प्रलंबित ठेऊन आठ गावातील नागरीकांना मिळणाऱ्या योजना सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप होत आहे.
2014 पासून नगर पंचायत ते नगर परिषदचा विषय राज्य सरकारला योग्यपणे हाताळता आलेला नाही, त्यामुळे अद्यापही हा विषय सर्वोच्य न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे नागरीकांना घरकुल योजनांसह अनेक योजनेचा लाभ हा शून्य ठरला आहे. त्यामुळे नगर परिषद संघर्ष समितीने आता पुढाकार घेऊन हा विषयावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. नागरिक हितांसाठी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात नगर परिषद संघर्ष समितीच्या वतीने बिरसी गावात महिलांच्या पुढाकाराने ‘माझा गाव, माझा बहिष्कार’, अशा घोषणा देत लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याची ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. यापूर्वीच नगर परिषद संघर्ष समितीच्यावतीने तहसिलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय निवडणूक आयोगकडे याबाबत लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. परंतु प्रशासनाने याची काहीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे गाव पातळीवर नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. आज बिरसी गावातील महिला पुरुषांनी लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.