
आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक महत्वाची बैठक झाली. या बैठकी संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांना माहिती दिली. “तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रविंद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे आमची एक बैठक झाली. त्या बैठकीत येणाऱ्या महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला. त्या बरोबर काल देखील माझी रविंद्र चव्हाण यांच्या बरोबर बैठक झाली. या चर्चेत महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. बोलणी सुरु झाली आहेत. स्थानिक पातळीवर पदाधिकारी परस्परांसोबत चर्चा करतील. जिथे कुठे अडचण येईल तिथे वरिष्ठ हस्तक्षेप करुन अडचण दूर करतील” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवणार का? या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी “कोणाला बाजूला ठेवण्याचा विषय नाही. आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत. स्थानिक, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु झाली आहे. महायुती मजबुतीने निवडणूकत लढेल. माझा अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ, आता देवेंद्र फडणवीस यांचा काळ” “मागच्या साडेतीन वर्षातील अनेक लोकाभिमुख कल्याणाकारी योजना महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहेत. कामाच्या आधारावर, विकासाच्या अजेंड्यावर आम्ही निवडणुका लढवणार आहोत.महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे. आम्ही काम करणारे लोक आहेत, निर्णय घेणारे लोक आहोत. महायुती सरकारने मागच्या साडेतीन वर्षात अनेक ऐतिहासिक, सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारे निर्णय घेतले आहेत” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
त्यांच्यासाठी इतर व्यवस्था आहे
महायुती म्हणून निवडणूक लढवताना बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही. या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “महायुतीमध्ये इच्छुक अनेक आहेत. ज्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांच्यासाठी इतर व्यवस्था आहे. तालुका कमिट्या, जिल्हा कमिट्या, स्थानिक पातळ्यावरील कमिट्या यामध्ये इच्छुकांना सामावून घेतलं जाईल” ‘आम्ही सर्वसमावेशक योजना केल्या. विकास करताना फरक केला नाही. लाडकी बहिण योजनेत भेदभाव केला नाही’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.