सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल : देवेंद्र फडणवीस

| Updated on: May 27, 2020 | 8:02 PM

देशातील 33 टक्के रुग्ण ज्या राज्यात आहे. ज्या राज्यातील मृत्यू जास्त आहेत. त्या राज्यातील मंत्री स्वत:ची पाठ थोपटतात

सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल : देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : “खोटं बोल, पण रेटून बोल, असा सरकारचा प्रयत्न सुरु आहे (Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi). देशातील 33 टक्के रुग्ण ज्या राज्यात आहे. ज्या राज्यातील मृत्यू जास्त आहेत. त्या राज्यातील मंत्री स्वत:ची पाठ थोपटतात”, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला (Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi) चोख प्रत्युत्तर दिलं. तसेच, सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला दिलेल्या मदतीची माहिती दिली. यानंतर आज शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या सर्व आरोपांवर प्रत्युत्तर दिले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील तर शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“केंद्र सरकारने डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेसचे जे पैसे दिले त्याचे पैसे ज्या खात्यात जायला पाहिजे त्याच खात्यात जातात. याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून पीपीई किट्स मिळाल्या नाहीत, असं सांगितलं गेलं. मात्र, केंद्र सरकारकडे कोणत्या राज्याला किती पीपीई किट्स दिल्या याचं डायनॅमिक डॅशबोर्ड आहे. त्यावर सविस्तर माहती असते. 26 मे पर्यंत महाराष्ट्राला 9 लाख 88 हजार म्हणजेच जवळपास 10 लाख पीपीई किट्स देण्यात आल्या आहेत”, असं फडणवीसांनी सांगितलं,

16 लाख N 95 मास्क दिले

“आम्ही विकत घेतो, हे सांगत असताना अनिल परब विसरले की पीपीई किट्स आणि N 95 मास्क खरेदीसाठी 468 कोटी केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये टेस्ट अधिक होत आहे, त्यामुळे रुग्णांची संख्या अधिक आहे, असं सांगण्यातच आलं. हे पूर्णपणे खोटं आहे. मुंबईत टेस्टची संख्या कमी करण्यात आली आहे. टेस्टमधून निघणारे पॉझिटिव्ह रुग्ण याचा हिशोब लावला तर आज संपूर्ण देशात टेस्ट झालेल्यांपैकी 5 टक्के रुग्ण हे पॉझटिव्ह निघतात.”

“महाराष्ट्रात 13 ते साडे 13 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. मे महिन्यात तर मुंबईत टेस्ट घेणाऱ्यांपैकी 35 टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मग कशाचा आधारावर हे सरकार स्वत:ची पाठ थोपवून घेत आहे? हे मला खरोखर समजत नाही”, असा सवाल फडणवीस यांनी केला (Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi).

“फार मोठ्या प्रमाणात विसंगत माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिव्यांगाना दिलेले 122 कोटी रुपये हे नेहमीच्या योजनेपेक्षा जास्त पैसे देण्यात आले आहेत. त्यासोबत SDRF चे जे पैसे आहेत, जे वर्षाअखेरीस मिळतात ते अॅडव्हान्समध्ये देण्यात आलेले आहेत. पण जाणीवपूर्व केंद्राचे पैसे घ्यायचे आणि हे आम्हाला मिळणारच होते, असं म्हणायचं. केंद्र सरकारने हे पैसे दिले आहेत. त्यामुळे केंद्राकडून पैसे येत नाहीत असं सांगू नका.”

खोटं बोल पण रेटून बोल, असा सरकारचा प्रयत्न : फडणवीस

“सगळ्यात महत्वाचं दरवेळेस एक अभासी आकडा सांगायचा. कधी सांगायचं केंद्राकडे 18 हजार कोटी तर कधी 16 हजार कोटी थकबाकी आहे, असं सांगितलं जातं. केंद्र सरकारकडून डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेसचे पैसे आले आहेत. नोव्हेंबरपर्यंत जीएसटीचे पैसे आले आहेत. डिसेंबर ते मार्चपर्यंतच्या पैशांबाबत कालच्या पत्रकार परिषदेत मी सांगितलं. जीएसटी कॉऊन्सिल त्याचा निर्णय घेते आहे. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल असा प्रयत्न केला गेला”, असं फडणवीस म्हणाले.

“स्थलांतरित मजुरांच्या जागी महाराष्ट्राच्या भुमिपुत्रांना काम मिळालं, तर त्याचं देखील मी स्वागत केलं आहे. पण हे स्वागत करत असताना हे काम जर त्यांना द्यायचं असेल तर त्यांना त्याबाबतची स्किल द्यावे लागतील. काही बिनास्किलची कामे मिळतील. पण स्किलच्या कामांसाठी प्रशिक्षण द्यावं लागेल. उदाहरणार्थ हिऱ्यांच्या उद्योगात मोठ्या प्रमाणात भंगारचा कामगार काम करतो. तो परत गेला तर ती स्किल महाराष्ट्रच काय कोणत्याच राज्याच्या कामगाराला लगेच मिळणार नाही.”

मित्र आणि शत्रू कोण हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे : फडणवीस 

“केवळ आभासी घोषणा करायच्या. देशातील 31 टक्के रुग्ण ज्या राज्यात आहे, 40 टक्के रुग्ण ज्या राज्यात आहेत त्या राज्याचे मंत्री आपली पाठ थोपटून घेत आम्ही कसं उत्तम काम करतो हे सांगत आहेत. या अशाप्रकारच्या पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा मुंबईत बेड्स कसे उपलब्ध होतील ते सांगा. मुंबईत रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होतो. यावर तुम्ही काय करणार हे सांगा? लोकांची टेस्टिंग होत नाही त्यावर काहीतरी सांगा. केवळ फेकाफेक करायची आणि खोटी आकडेवारी सांगायची, याने महाराष्ट्राचं भलं होणार नाही. मित्र आणि शत्रू कोण हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं माहिती आहे. या परिस्थितीत आम्ही प्रत्येक वेळेस सरकारच्या पाठीशी उभी रायची भूमिका घेतली. आजही आम्ही सरकारला मदतच करतोय. पण सरकारच्यावतीने अशाप्रकारची फेकाफेक करता येत असेल तर आम्ही पर्दाफाश करु”, असा इशारा फडणवीसांनी (Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi) दिला आहे.

संबंधित बातम्या :

चिडलेल्या रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुटल सोडल्या, सरकारच्या बदनामीचा प्रयत्न : अनिल परब

महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखणाऱ्या फडणवीसांचा मोदींच्या स्किल इंडियावर विश्वास नाही : जयंत पाटील

फडणवीसांची आकडेवारी आभासी, महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न : महाविकास आघाडी