
सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला प्रस्ताव दिला होता. एका व्यक्तीच्या माध्यमातून फडणवीस यांनी आपल्याकडे निरोप पाठवला होता, असा दावा अनिल देशमुख यांनी पुन्हा केला आहे. तसेच आपल्याकडे या संदर्भातील व्हिडीओ क्लिप्स आहेत, असा दावाही त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. तर, देशमुखांनी व्हिडीओ क्लिप्स जाहीर कराव्यातच. माझ्याकडेही क्लिप्स आहेत, त्या जाहीर करेन, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यात चांगलीच जुंपली असून त्या क्लिप्समध्ये काय दडलंय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अनिल देशमुख यांनी या क्लिप्सचा उल्लेख केला आहे. समित कदम नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी मला ऑफर दिली होती. ईडीपासून वाचवण्यासाठी ही ऑफर होती. या ऑफरनुसार उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर मला खोटे आरोप करायचे होते. या खोट्या आरोपाचे चार प्रतिज्ञापत्र समित कदम घेऊन आला होता. त्यावर मला सही करायची होती. सही केली असती तर हे चारही नेते अडकले गेले असते आणि मी ईडी कारवाईतून सुटलो असतो. त्यासाठीच ही ऑफर फडणवीस यांनी दिली होती, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. समित कदम याने पाच ते सहावेळा माझी भेट घेतली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.
माझ्याकडे याबाबतचे पुरावे आहेत. व्हिडीओ क्लिप्स आहेत, असा दावाही देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांच्या या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख खोटे नरेटिव्ह सेट करत आहेत. त्यांनी पुरावे द्यावेत. त्यांनी व्हिडीओ क्लिप दाखवल्यानंतर मी माझ्याकडच्या सर्व क्लिप्स सार्वजनिक करेल, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. समित कदम हे मिरजचे रहिवासी आहेत. ते जुनसुराज्य पक्षाचा युवाशाखेचा अध्यक्ष आहे. त्यानेच आपल्याला लिफाफ्यातून प्रतिज्ञापत्र देण्याचा प्रयत्न केल्याचं देशमुख म्हणाले.
देशमुख यांच्या मते त्यांच्याकडे असलेल्या क्लिप्समध्ये समित कदम यांच्याबरोबरचं संभाषण आहे. हे संभाषण जाहीर झाल्यास राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडू शकते, असं सांगितलं जात आहे. फडणवीस यांनी त्यांच्याकडील क्लिप्समध्ये नेमकं काय आहे? हे समजू शकलं नाही. पण फडणवीस यांच्याकडेही अशाच संभाषणाच्या क्लिप्स असाव्यात असं सांगितलं जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावर खासदार संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनिल देशमुख सुद्धा आजकाल नवीन नवीन स्टोरी लिहायला लागले आहेत. जेलमधून सुटून किती दिवस झाले? त्यामुळे त्यांनाही संजय राऊत नावाचा कुत्रा चावलेला दिसतो, अशी टीका संदीपान भुमरे यांनी केली आहे.
आमदार सदाभाऊ खोत यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजकारणात अनेक लोक नेते झाल्यावर जवळ येतात. हा घोटाळेबाज आहे, असं प्रत्येकाच्या कपाळावर लिहिलेलं नसतं. तुम्ही गृहमंत्री होतात तर मग गप्प का बसलात? आरआर आबांकडेही लोक आली, पण त्यांनी गुन्हे नोंदवले. आता वरात निघून गेल्यावर फटाके का फोडताय? विधानसभा जवळ येईल तशी वांझोट्यांना लेकरं होतील, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकशाहीमध्ये कुणावर कुणालाही आरोप करता येतो. अनिल देशमुख यांनी दोन वर्षांनी हा मुद्दा का काढला? महाराष्ट्रातील जनता यावर विश्वास ठेवणार नाही, असं चंद्रकांत दादा म्हणाले.
आमदार परिणय फुके यांनीही देशमुखांवर टीका केली. अनिल देशमुख मेडिकल बेलवर जामिनावर आहेत. पण ते सर्वच कार्यक्रमात जाताना दिसत आहे. निवडणुकीतही त्यांनी प्रचार केला. ते आजारी वाटत नाही. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करून त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकावं, अशी मागणी परिणय फुके यांनी केली आहे.