
Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भारतीय निवडणूक आयोगाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तसेच इतर राज्यांच्या निवडणुकीत मोठा घोळ झाला आहे. मतदारांची संख्या वाढवण्यात आली. मतदान संपल्यानंतर अचानक मतदार वाढले, एका मतदाराचे नाव दोन ते तीन राज्यांत आहे, असे गंभीर आरोप राहुल गांंधी यांनी केले. तसेच हा आरोप करताना त्यांनी थेट पुरावेही दिले आहेत. राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आता राहुल गांधींच्या याच आरोपांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींची हार्डडिस्क करप्ट झाली आहे, असा टोला फडणवीसांनी लगावलाय.
खरं सांगायचं तर मतांची चोरी ही महाराष्ट्रात तसेच भारतात कुठेही झालेली नाही. राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली आहे. त्यांची हार्डडिस्क करप्ट झाली आहे. म्हणून ते त्याच-त्याच गोष्टी रोज बोलत आहेत. ते खोटं बोलून पळून जात आहेत, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
तसेच राहुल गांधी हे रोज वेगवेगळे आकडे देत आहेत. महाराष्ट्रात 75 लाख मतदार वाढले, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता ते महाराष्ट्रात 1 कोटी मतदार वाढले आहेत, असा दावा करतायत. दरवेळी काहीतरी नवे सांगून ते लक्ष खेचण्याचा प्रयत्न करतात. त्यांची जमीन संपलेली आहे, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. बिहारमध्येही आम्हाला निवडून येता येणार नाही. महाराष्ट्रातील पुढच्याही निवडणुकीत आमचा विजय होणार नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे अगोदरच ते असा प्रकारची फायरिंग करून ठेवत आहेत, असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
बिहारमध्ये निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे सर्वसमावेशक पुनरावलोकन केले जात आहे. याला मात्र राहुल गांधी विरोध करत आहेत. या पुनरावलोकनासाठी मी 2012 साली याचिका दाखल केली होती. ते मात्र याला विरोध करत आहेत. असं असेल तर मतदार याद्यांत कशी सुधारण होईल? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाची भूमिका, मतदानाची प्रक्रिया यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रासह अन्य राज्यात विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा घोळ घालण्यात आला, असा दावा राहुल गांधी यांनी केला. हा दावा करताना त्यांनी काही पुरावेही सादर केले. तसेच भाजपाच्या भूमिकेवरही त्यांनी यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.