Dhananjay Mahadik | महाडिक कुटुंबात विजयी गुलालाची उधळण, कोल्हापुरात धनंजय महाडिकांचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

कोल्हापूरमध्ये शिरोली येथे आज धनंजय महाडिक यांच्या घरी कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. धनंजय महाडिक यांचे चुलते महादेव महाडिक यांना भेटण्यासाठी धनंजय महाडिक पोहोचले.

Dhananjay Mahadik |  महाडिक कुटुंबात विजयी गुलालाची उधळण, कोल्हापुरात धनंजय महाडिकांचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
कोल्हापुरात धनंजय महाडिक यांचं जंगी स्वागत
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 12, 2022 | 2:48 PM

कोल्हापूरः राज्यसभा निवडणुकीनिमित्त रंगलेल्या  कोल्हापूरच्या आखाड्यात शिवसेनेच्या उमेदवाराला (ShivSena Candidate) धूळ चारल्यानंतर प्रथमच भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आज कोल्हापुरात दाखल झाले. मागील अनेक वर्षांपासून महाडिक कुटुंबाला स्थानिक राजकाराणात पिछाडीवर रहावे लागले होते. मात्र यंदा राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या पाठिंब्याने धनंजय महाडिकांचा मोठा विजय झाला. या पार्श्वभूमीवर आज धनंजय महाडिक हे त्यांचे काका महादेव महाडिकांच्या भेटिला पोहोचले. यावेळी कोल्हापुरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. महादेव महाडिकांचे (Mahadev Mahadik) कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात धनंजय महाडिकांचं स्वागत केलं.

शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव

राज्यसभा निवडणुकीत कोल्हापूरचे भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात शिवसेनेनं कोल्हापुरातूनच संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. अत्यंत चुरशीच्या अशा या लढतीत भाजपच्या पाठिंब्याने धनंजय महाडिकांचा विजय झाला. कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासून धनंजय (मुन्ना) महाडिक विरुद्ध काँग्रेसचे सतेज (बंटी) पाटील यांच्यात राजकीय वितुष्ट आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने या दोघांमध्येही प्रतिष्ठेची लढाई रंगली होती. कोणत्याही स्थितीत महादेव गटाचा पराभव व्हावा, या ईर्ष्येने बंटी पाटील कामाला लागले होते. मात्र राज्यसभेच्या परीक्षेत महाविकास आघाडीचा उमेदवार संजय पवार यांचा अखेर पराभव झाला.

अमल महाडिकांची प्रतिक्रिया काय?

महाडिक कुटुंबानी कोल्हापुरच्या राजकारणात आणि समाजकारणा खूप काम केलं आहे. त्यांची दुसरी पिढी आता राजकारणात सक्रीय असल्याची प्रतिक्रिया अमल मडाडिक यांनी दिली. भाजपने एवढी मोठी संधी आम्हाला दिली असून संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न माझा परिवार आणि माझे खासदार धनंजय महाडिक अग्रक्रमाने सोडवतील, असा विश्वास धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल महाडिक यांनी व्यक्त केले.

‘महाडिक कुटुंबियांचा बॅडपॅच संपला’

दरम्यान, विजयी सभेला संबोधित करताना धनंजय महाडिक यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली. राज्यसभेच्या निमित्ताने महाडिक कुटुंबियांचा बॅडपॅच संपला, आता विधानसभा निवडणुकीतही हाच उत्साह कायम राखू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

शिरोलीत कार्यकर्त्यांचा उत्साह

कोल्हापूरमध्ये शिरोली येथे आज धनंजय महाडिक यांच्या घरी कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. धनंजय महाडिक यांचे चुलते महादेव महाडिक यांना भेटण्यासाठी धनंजय महाडिक पोहोचले. याआधीपासूनच कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष सुरु केला होता.