अजित पवारांचं आवाहन, विधानपरिषद निवडणुकीत भाजपची माघार

| Updated on: Jan 17, 2020 | 3:44 PM

बीड विधानपरिषदेसाठी भाजपकडून दाखल झालेला राजन तेली यांचा अर्ज मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे संजय दौंड यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अजित पवारांचं आवाहन, विधानपरिषद निवडणुकीत भाजपची माघार
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केल्यामुळे भाजपने आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे बीड विधानपरिषदेवर राष्ट्रवादीच्या तिकीटावर संजय दौंड बिनविरोध (Vidhan Parishad Election Unopposed) निवडून आले आहेत.

बीड विधानपरिषदेसाठी भाजपकडून दाखल झालेला राजन तेली यांचा अर्ज मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे संजय दौंड यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या 24 जानेवारीला विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही केवळ औपचारिकता असेल.

संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. परळी मतदारसंघात दौंड कुटुंबाचा दबदबा राहिला आहे. 2014 मध्ये चारही पक्ष जेव्हा स्वबळावर लढले होते, तेव्हा संजय दौंड यांनी परळी मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीटासाठी फील्डिंग लावली होती.

धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीच्या तिकीटावर काँग्रेस नेता

संजय दौंड अनेक वर्ष बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करत आलेले आहेत. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत पण शरद पवार यांनी बीड विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता. त्यामुळे आता त्यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात येत आहे.

धनंजय मुंडे हे बीडमधील परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्याने बीड विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. धनंजय मुंडे यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2022 पर्यंत होती.

विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता महाराष्ट्र विकास आघाडीचा उमेदवार जिंकून येणं साहजिक होतं. मात्र भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ही लढत चुरशीची (Vidhan Parishad Election Unopposed) झाली होती.