काँग्रेसमधून शिवसेनेत आलेला माजी आमदारच प्रणिती शिंदेंना भिडणार

| Updated on: Oct 02, 2019 | 1:14 PM

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात प्रणिती शिंदे विरुद्ध दिलीप माने असा सामना रंगणार आहे. एकप्रकारे काँग्रेसचा माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांच्यामध्येच लढत होणार आहे.

काँग्रेसमधून शिवसेनेत आलेला माजी आमदारच प्रणिती शिंदेंना भिडणार
Follow us on

सोलापूर : काँग्रेसमधून शिवसेनेच्या गोटात आलेले माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane Vs Praniti Shinde) यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाली आहे. तिकीटासाठी ‘मातोश्री’वर तळ ठोकणाऱ्या महेश कोठे यांचा पत्ता कट झाला आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून दिलीप मानेंना उमेदवारी मिळाली आहे.

दिलीप माने यांना शिवसेनेने एबी फॉर्मही वाटला आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी आशा लावून बसलेल्या महेश कोठे यांचा हिरमोड झाला आहे.

महाआघाडीतर्फे काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघात प्रणिती शिंदे विरुद्ध दिलीप माने (Dilip Mane Vs Praniti Shinde) असा सामना रंगणार आहे. एकप्रकारे काँग्रेसचा माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांच्यामध्येच लढत होणार आहे.

शिवसेनेसाठी सोलापूरमध्ये चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला होता. हा पेच सोडवण्यासाठी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच शिष्टाई करण्याची वेळ आली आहे. पक्षातील जुन्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायचं की आयारामांना हा प्रश्न उभा राहिला होता. मात्र आयारामांच्या पारड्यात मत पडलं आहे.

उद्धव ठाकरेंनी कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय थेट दावेदारांवरच सोपवल्याची माहिती स्वतः दिलीप माने यांनी दिली होती. “उद्धव ठाकरे यांनी मला आणि महेश कोठे यांना समोरासमोर बसवलं. तुम्हा दोघांमध्ये कुणाला उमेदवारी द्यायची हे तुम्हीच ठरवा. हे ठरवण्यासाठी तुम्हाला 1 ऑक्टोबरपर्यंत वेळ दिली.” असं माने म्हणाले होते.

कोण आहेत दिलीप माने?

दिलीप माने हे काँग्रेसच्या तिकीटावर सोलापूर दक्षिण मतदारसंघातून 2009 मध्ये आमदारपदी निवडून आले होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप माने यांना पराभवाचा सामना करावा लागला. अवघ्या महिनाभरापूर्वीच काँग्रेसची साथ सोडत माने यांनी शिवबंधन हाती बांधलं.

कोण आहेत महेश कोठे?

शिवसेनेच्या महेश कोठे यांनी सोलापूर मध्य मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली होती. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. प्रणिती शिंदे आणि महेश कोठे यांच्यात चांगलंच शत्रुत्व आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार महेश कोठे यांना 33 हजारपेक्षा जास्त मते मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर होते.

सोलापूरचा आढावा | काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर युतीचं तगडं आव्हान 

दुसरीकडे करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट करत शिवसेनेने या मतदारसंघात राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकूणच शिवसेनेचं आयारामांकडे झुकतं माप असल्याचं दिसत आहे. मात्र याचाच फटका बसून बंडखोरी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महिलांना मेकअप बॉक्सचं वाटप, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा