Maharashtra politics : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंमध्ये दोन दिवसांत चर्चा, दिपाली सय्यद यांचं ट्विट, भाजपा नेत्यांचेही मानले आभार

| Updated on: Jul 17, 2022 | 9:16 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना (Sivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांची येत्या दोन दिवसांत चर्चा होणार असल्याचे ट्विट शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद यांनी केले आहे.

Maharashtra politics : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंमध्ये दोन दिवसांत चर्चा, दिपाली सय्यद यांचं ट्विट, भाजपा नेत्यांचेही मानले आभार
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना (Sivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांची येत्या दोन दिवसांत चर्चा होणार असल्याचे  ट्विट शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद यांनी केले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट हे पुन्हा एकत्र येणार का, या चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटाकडूनही सातत्याने हीच भूमिका घेण्यात येत होती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याचे शिंदे गटाकडून सातत्याने टाळण्यात येत होते. त्यामुळे आता दिपाली सय्यद यांच्या ट्विटनंतर खरंच अशी काही भेट किंवा चर्चा या दोन नेत्यांमध्ये होणार का, याकडे सगळ्या राज्याचे आणि देशाचे लक्ष लागले आहे.

काय लिहिलंय ट्विटमध्ये

दिपाली सय्यद या बंडाच्या वेळेपासूनच शिंदे आणि ठाकरे यांनी एकमेकांशी चर्चा करावी, अशी भूमिका घेत होत्या. त्यांनी 16 जुलैला रात्री 11 च्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की- येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थीकरता भजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल.

हे सुद्धा वाचा

 

भाजप नेत्यांना केले टॅग

हे ट्विट करताना त्यांनी काही भाजपा नेत्यांचेही आभार मानले आहेत. त्यांची नावे त्यांनी ट्विटमध्ये घेतली नसली तरी त्यांनी ट्विट टॅग करताना उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासोबतच विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी या मध्यस्थीसाठी प्रय़त्न केले का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांच्या मुंबई भेटीच्या वेळी त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी, यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु होते. सध्याच्या राज्याच्या राजकारणात नसलेले विनोद तावडे त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत होते. ती भेट झाली नसली तरी आता शिंदे आणि ठाकरे यांच्या भेटीमागे तावडे, पंकजा मुंडे आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

शिंदे-भाजपा गटाची काय प्रतिक्रिया असणार?

आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तयारीत असलेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसेच इतर नेते यांच्या यावर काय प्रतिक्रिया असणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे पुन्हा एकदा मनोमीलन झाले, तर शिवसेनेतील फूट टळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. आता दीपाली सय्यद यांच्या ट्विटनंतर खरंच अशी भेट होणार का, याकडे सगळ्या राज्याचे  लक्ष लागले आहे.