Disha Salian case: दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट! सचिन वाझेंनी केला थेट खुलासा, नेमकं काय म्हणाले?
Disha Salian case: राज्यात दिशा सालियान प्रकरण हे चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात आता नवे वळण आले आहे. या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपालून राज्यात दिशा सालियन प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. दिशा सालियन प्रकरणात माजी एटीएस अधिकारी सचिन वाझे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट करत एनआयए कोर्टाकडे अर्ज केला आहे. या अर्जात वाझे यांनी आपले नाव जाणीवपूर्वक घेऊन बदनामीची मोहीम चालविण्यात येत असल्याचा दावा केला आहे.
सचिन वाझे यांनी कोर्टात सादर केलेल्या स्वलिखित अर्जात म्हटले आहे की, दिशा सालियन प्रकरणात त्यांचे नाव जाणीवपूर्वक घेतले जात असून त्यांच्याविरुद्ध बदनामीची मोहीम सुरू आहे. सतीश सालियन यांचे वकील आणि काही माध्यमे ही मोहीम जाणीवपूर्वक चालवत असल्याचा उल्लेख अर्जात करण्यात आला आहे.
निलेश ओझा यांनी याआधी वाझेच्या लोकांनी त्यांना संपर्क केला असून त्यांच्याकडे वाझेचा दिशाच्या प्रकरणात कबुली जबाब असून यातले पुरावे त्याने नष्ट केले तसेच तो माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचा केला होता दावा. या दाव्याला वाझे यांनी अर्जात सक्त विरोध केला आहे. वाझे म्हणतात, “मी निलेश ओझा नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही आणि माझ्याकडून कुठलीही माणसे त्यांच्याकडे पाठवण्यात आलेली नाहीत.” हा दावा पूर्णपणे खोटा असून आपल्याबद्दल होत असलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात कबुलीजबाब देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
तसेच सीबीआयने या प्रकरणात जर त्यांचे प्रोडक्शन वारंट मागितले तर त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जावे आणि त्यानंतरच निर्णय घ्यावा, अशी विनंती वाझे यांनी कोर्टाकडे अर्जाद्वारे केली आहे. दिशा सालियन प्रकरणात सचिन वाझे यांची भूमिका यापूर्वी समोर आलेली नव्हती. या अर्जामुळे प्रकरणात नवे आयाम समोर येण्याची शक्यता आहे.