यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी

| Updated on: Feb 04, 2020 | 11:04 AM

दुष्यंत चतुर्वेदींचा विजय निश्चित होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये जल्लोष करण्यास सुरुवात केली होती.

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी
Follow us on

यवतमाळ : यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत (Yawatmal Vidhan Parishad Bypoll Result) भाजपला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले आहेत, तर भाजपच्या सुमित बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

दुष्यंत चतुर्वेदी यांनी पहिल्या फेरीत 298 मतांचा कोटा पूर्ण करत विजयी आघाडी घेतली होती. भाजपच्या सुमित बाजोरिया यांना पहिल्या फेरीत 185 मतं मिळाली होती, तर 6 मतं बाद ठरली होती. दुष्यंत चतुर्वेदींचा विजय निश्चित होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये जल्लोष करण्यास सुरुवात केली होती.

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी शुक्रवार 31 जानेवारीला मतदान झालं होतं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं आधीपासूनच जड मानलं जात होतं.

यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत विधानपरिषदेचे सदस्य होते. ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या जागी माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. चतुर्वेदींनी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.

कोण आहेत दुष्यंत चतुर्वेदी?

  • दुष्यंत चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता
  • दुष्यंत चतुर्वेदी हे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव आहेत
  • सतीष चतुर्वेदी हे विदर्भाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. ते 25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री होते
  • दुष्यंत चतुर्वेदी सध्या त्यांच्या शैक्षणिक संस्थांचं काम पाहण्यासोबतच सामाजिक कामांमध्येही व्यस्त असतात.
  • वडील सतीष चतुर्वेदी यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं.
  • विदर्भात सतीष चतुर्वेदी यांचा मोठा जनसंपर्क आहे.

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील पक्षीय बलाबल

  • भाजप – 147
  • शिवसेना – 97
  • काँग्रेस – 92
  • राष्ट्रवादी काँग्रेस- 51
  • प्रहार – 18
  • इतर – 72
  • बसपा – 4
  • एमआयएम – 8
  • एकूण – 489

Yawatmal Vidhan Parishad Bypoll Result