Devendra Fadnavis : पुनर्विकासात घरे गेलेल्यांना भाडं देणं बंधनकारक ते महापालिकेवर भगवा फडकावयचाच; फडणवीसांच्या भाषणातील 8 खणखणीत मुद्दे

| Updated on: Aug 20, 2022 | 2:38 PM

Devendra Fadnavis : रिडेव्हल्पमेंटमध्ये भाडं मिळत नाही. आता पुनर्विकासात भाडं मिळणं बंधनकारक करणार आहोत. आपण सर्व रखडलेला विकास पूर्ण करणार आहोत. सामान्य माणसाचं स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

Devendra Fadnavis : पुनर्विकासात घरे गेलेल्यांना भाडं देणं बंधनकारक ते महापालिकेवर भगवा फडकावयचाच; फडणवीसांच्या भाषणातील 8 खणखणीत मुद्दे
महापालिकेवर भगवा फडकावयचाच; फडणवीसांच्या भाषणातील 8 खणखणीत मुद्दे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये भाजपचा (bjp) कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेनेला (shivsena) घेरले. शिवसेनेने कोरोनाच्या काळातही मोठा भ्रष्टाचार केल्याचा हल्लाबोल करतानाच पालिकेतील सत्ता उलथवून लावण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. तसेच मागच्यावेळीच भाजपचा महापौर झाला असता. पण शिवसेनेसाठी आम्ही दोन पावलं मागे आलो, असा गौप्यस्फोटही देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून आले त्यांनी मुंबईला वाऱ्यावर सोडलं. आपल्याला बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असंही ते म्हणाले. फडणवीस यांनी आपल्या भाषणात महत्त्वांच्या मुद्द्याला हात घातला. त्यावर टाकलेला प्रकाश.

आता सर्व जोरात करायचं

तुम्ही कालची मुंबई पाहिली का. तीच परंपरा, संस्कृती ही आपली परंपरा आहे. आपलं सरकार आल्यावर काय घडतं हे सर्व सर्वांनी पाहिलं. आता सर्व जोरात करायचं आहे. गणेशोत्सव जोरात, नवरात्र जोरात, दिवाळी जोरात, आंबेडकर जयंती जोरात आणि शिवजयंतीही जोरात. आता सर्व जोरात करायचं. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाही. आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाही, असा टोला फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.

हे सुद्धा वाचा

तेव्हाच भाजपचा महापौर झाला असता

मागच्यावेळीच आपण महापौर बसवू शकलो असतो. आपली तयारी झाली होती. पण मित्र पक्षासाठी दोन पावलं मागे गेलो आणि त्यांना महापौर बनवू दिला. आता आपलाच महापौर बसेल. शिवसेना-भाजप युतीचा महापौर बसेल. आपला भगवा महापालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही. आशिष तुम्ही क्रिकेट खेळणारे आहात आणि जाणाणारे आहात. त्यामुळे तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी कशी खेळायची आणि जिंकायची तुम्हाला माहीत आहे. हा सामना तुम्ही जिंकणारच आहात, अस ते म्हणाले.

मागचा रेकॉर्ड मोडणार

एमसीएमध्ये शेलारांनी मुंबई प्रीमीयर लिग सुरू केली आहे. आता पालिकेत मुंबई महापालिका विकास लीग तयार करायची आहे. मध्ये एखादा फुटबॉल आला, अडथळा आला तर त्याला किक कशी मारायची हे तुम्हाला माहीत आहेत. तुम्ही दोरी उड्या असोसिएशनचे अध्यक्ष आहात. त्यामुळे कुणी कितीही उड्या मारल्या तरी त्याला किती उड्या मारू द्यायच्या हे तुम्हाला माहीत आहे. मागचा आपला स्ट्राईक रेट मोठा होता. आपण 35 वरून 80 जागांवर आलो. आता आपला स्ट्राईक रेट मागचा रेकॉर्ड मोडणारा असला पाहिजे याकडे आमची नजर आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आता त्यांनाही भाडं मिळणार

धारावीचा विकास करणार आहोत. धारावीतली अडथळे तीन महिन्यात दूर करणार आहोत. केंद्र आणि राज्याच्या भूखंडावरील समस्या दूर करू. मुंबईकरांना हक्काचं घर मिळावं म्हणून सरकार प्रयत्न करणार आहोत. रिडेव्हल्पमेंटमध्ये भाडं मिळत नाही. आता पुनर्विकासात भाडं मिळणं बंधनकारक करणार आहोत. आपण सर्व रखडलेला विकास पूर्ण करणार आहोत. सामान्य माणसाचं स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

महापालिकेला भ्रष्टाचाराचा विळखा

मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचा मोठा विळखा पडला आहे. किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली. आपल्या टीमनेही घोटाळे काढले. गेल्या 15 वर्षापासून जे प्रकल्प सुरू आहेत. हे प्रकल्प काही लोकांची दुभती गाय झाले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून मलई खाण्याचं काम केलं जात आहे. कोरोनाच्या काळात प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम सुरू होतं. मलई कशी खाता येईल हेच यांचं लक्ष होतं. सामान्य माणूस, रुग्ण यांच्याकडे यांचं लक्ष नव्हतं. रोज एक कंपनी निघायची आणि त्यांना कामं दिलं जायची. पण ही कामे व्हायची नाही की नाही माहीत नाही, असंही ते म्हणाले.

किमान डायलॉग तरी चेंज करा

निवडणूक जवळ आल्यावर भावनिक मुद्दे सुरू होतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र… असा आरोप होईल. त्यांना माहीत आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलं जाणार नाही. कारण संविधान आहे. पण मुद्दाम भ्रम तयार केला जात आहे. त्यांनी किमान डायलॉग तरी चेंज करावा, असा टोला त्यांनी लगावला.

अनेकदा दिल्लीत जाऊ

दुसरं मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही, अशी शेरेबाजी केली जाईल. कोण झुकवतोय. मुंबई मुंबई आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. दिल्ली दिल्ली आहे. देशाची राजधानी आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेले तर दिल्लीश्वरांसमोर झुकले. अरे एवढे दिवस काँग्रेसचे मुख्यमंत्री, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. तेही दिल्लीत जायचे. जावंच लागतं दिल्लीत. ती राजकीय राजधानी आहे. दिल्ली राजकीय राजधानी असेल तर दिल्लीत जावंच लागेल. त्याशिवाय प्रकल्प कसे पूर्ण होतील? तुम्ही दिल्लीत गेला. पण सोनिया गांधींसमोर नतमस्तक होण्यासाठी गेला. काही झालं तरी चालेल पण मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही. पण मुंबईकरांच्या हितासाठी मुख्यमंत्री आणि मला जितकी वेळा जावं लागेल तितके वेळा जाऊ आणि मान्यता आणू, असंही ते म्हणाले.

तुमचा इंटरेस्ट बिल्डरांमध्ये

त्यांचे डायलॉग बोथट झाले आहेत. मराठी माणसाला विस्थापित केलं जाणार आहे. तुमचं राज्य मुंबईत होतं. गिरगावकर मिरा भाईंदरला का गेला? कुणामुळे गेला? तुमच्यामुळे गेला. तुमच्याकडे महापालिका होती. हजारो कोटी रुपये होते. त्यांच्या घराचा प्रश्न तुम्ही सोडवू शकला नाही. पण मेट्रोमुळे विस्थापित होणाऱ्या मराठी माणसाला आम्ही घर दिलं. बीडीडी चाळीचा प्रश्न इतकी वर्ष का सोडवला नाही. 20 ते 25 वर्ष तुम्ही त्यांचा प्रश्न सोडवला नाही. कारण तुमचा इंटरेस्ट बिल्डरात होता. आम्ही झटक्यात निर्णय घेतला आणि म्हाडाकडे काम दिलं. आम्ही 500 चौरस फुटाचं घर देण्याचं काम आम्ही केलं. त्यांच्या मुद्द्याला काही अर्थ नाही. आम्ही मराठी माणसासाठी प्रामाणिकपणे लढत आहोत, असंही ते म्हणाले.