अजितदादा-एकनाथ शिंदे यांच्यात पडद्यामागे संघर्ष? नेमकं काय घडतंय?

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांत निधीवाटपावरून संघर्ष सुरू आहे. असे असतानाच आता नवी माहिती समोर आली आहे.

अजितदादा-एकनाथ शिंदे यांच्यात पडद्यामागे संघर्ष? नेमकं काय घडतंय?
eknath shinde and ajit pawar
| Updated on: Jun 24, 2025 | 7:25 PM

Ajit Pawar Vs Eknath Shinde : मुंबईतल्या मंत्रालयात आज (24 जून) मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांनी निधीवाटपावरून शिंदे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीदेखील आक्रमक पवित्रा धारण केल्याचं बोललं जातंय. अजित पवार यांच्या खात्यावर वॉच ठेवा असं शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता शिंदे आणि अजित पवार यांच्यात पडद्यामागे संघर्ष चालू झाला आहे का? असं विचारलं जातंय.

नेमकं काय घडलं?

आज मंत्रालयात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांत बैठक पार पडली. या बैठकीत जे आपल्या हक्काचं आहे, ते आपल्याला मिळालंच पाहिजे, अशी भूमिका घेत शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना अजित पवार यांच्या अर्थखात्यावर नजर ठेवण्याचं सांगितल्याचं बोललं जातंय. त्यानंतर आता शिवसेनेचा अजित पवार यांच्या अर्थखात्यावर वॉच राहणारा का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

शिवसेनेचे मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडल्यानंतर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार स्वत: एकनाथ शिंदे यांच्या दालनात गेले. त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय घडतंय? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

मी पैसे खिशात घेऊन फिरतो का?

दुसरीकडे या घडामोडीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. याआधीही शिंदे यांचे मंत्री तसेच आमदार यांच्यात आणि अजित पवार यांच्यात निधिवाटपावरून अनेकदा संघर्ष झालेला आहे. मी पैसे खिशात घेऊन फिरतो का? असे अजित पवार या आधी म्हणाले होते. भाजपाच्या आमदारांनीही निधीवाटपावरून अजित पवार यांची तक्रार थेट केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते अमित शाहा यांच्याकडे केली होती. त्यामुळे निधीवाटपावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात संघर्ष चालू आहे, अशी चर्चा रंगली आहे.

अजित पवार, एकनाथ शिंदेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली?

याविषयी खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्र्यांसोबत नियमित आढावा बैठ झाली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी याविषयी आमची चर्चा झाली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तर ज्यांना कुणाला माझ्या खात्यावर वॉच ठेवायचा आहे, त्यांनी ठेवायला हवा. त्यांचे स्वागत आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.