
मुंबई: गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण (Politics In Maharashtra) चांगलंच तापलंय. कधी शिंदे गटाचे पारडे जड होते, तर कधी मुख्यमंत्री उद्धव यांचे पारडे जड होतय. गेल्या आठवड्यापासूनच मुंबई-वडोदरा-गुवाहाटीमार्गे- दिल्ली असा हा राजकीय खेळ सुरूये. मात्र एकनाथ शिंदे यांच्या या बंडाचा (Rebel) निकाल काय लागेल, याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) संख्याबळात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा खूप पुढे असल्याचा दावा करत असले तरी मुंबईपासून 2700 किमी अंतरावर असलेल्या गुवाहाटीत ते आपली ताकद दाखवत आहेत. इथे शिवसेना नेते संजय राऊत बंडखोरांना मुंबईत येण्याचे आव्हान देत आहेत, या संदर्भात राऊत यांनी आज ट्विट करून शिंदे गटाला टोला लगावला आणि तुम्ही गुवाहाटीत किती दिवस लपून बसणार, तुम्हाला कधीना कधी मुंबईत (चौपाटीत) यावं लागेल असं ट्विट केलंय. काही अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याशिवाय सध्या शिवसेनेच्या 38 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
शिंदे गट त्यांच्या गटासह मुंबईत का येत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामागे अनेक कारणे आहेत असे दिसते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रकृती अजूनही खराब आहे. कोश्यारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यपालांशिवाय महाराष्ट्रात कोणतीही कारवाई शक्य नाही, त्यामुळे शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना गुवाहाटी या भाजपशासित राज्यातच ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.
दरम्यान, उपसभापती नरहरी झिरवाळ यांनीही सर्व 16 आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांची उत्तरे मागवली आहेत. उपसभापतीच्या सूचनेनुसार, त्यांनी 27 जूनपर्यंत उपसभापतींना लेखी द्यावयाचे आहे. शिवसेनेने या आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. पुढील घडामोडी स्पष्ट होईपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या गटाला मुंबईत जायचे नाही. कारण तयारीशिवाय मुंबईत आले तर बंडखोर आमदार फोडण्याचा धोका आहे. त्यामुळे उपसभापतींना उत्तर देण्याऐवजी शिंदे गटाने आता कोर्टात जाण्याचे ठरवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वप्रथम उपसभापतींच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले जाईल. उपसभापतींविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत उपसभापतींना कोणत्याही सदस्याला अपात्र ठरवण्याची नोटीस पाठविण्याचा अधिकार नाही.
खरे तर एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात आल्यावर आपला बंडखोर गट सांभाळता येणार नाही किंवा शिवसेनेच्या लोकांशी स्पर्धा करता येणार नाही, असे वाटते. उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सध्या सरकारमध्ये असल्याने बंडखोरांना मुंबईत आल्यावर शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार. शिवसेनेचे कार्यकर्ते शनिवारपासून रस्त्यावर उतरतायत, ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत, कधी कुठलं आंदोलन हिंसक वळण घेईल याचा भरवसा नाही म्हणून संघर्षाची भीती असणारे बंडखोर आमदार मुंबईत येणं टाळत आहेत. दरम्यान, केंद्राने शिवसेनेच्या १५ बंडखोर आमदारांना Y+ श्रेणीची सुरक्षा दिली आहे.
भाजपशासित गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे गट स्थापन करण्याचा एक फायदा म्हणजे इथून ते भाजपशी सहज जुळवून घेऊ शकतात. शनिवारीच शिंदे यांनी वडोदरा येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त आले होते. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खऱ्या घडामोडी सुरू होणार आहे. आता भाजप किंवा एकनाथ गट लवकरच फ्लोअर टेस्टची मागणी करू शकतात.