
मुंबई : राज्यातील सत्तापालटानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत. आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून संघटन मजबूत करण्याकडे भर दिल्याचं पाहायला मिळतंय. काल नाशिक, औरंगाबादनंतर आज आदित्य ठाकरे यांनी पैठणमध्ये शिवसंवाद यात्रा काढली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरेही महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेही ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. शिंदे हे देखील राज्याचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काल शुक्रवारी दिल्ली दौऱ्यावर होते. त्यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, राष्ट्रपतींच्या विजयानंतर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे जेवण होतं. त्या ठिकाणी सर्वच भेटले. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असं शिंदे यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टातील सुनावणीसाठी थांबला आहात का? असा प्रश्न विचारला असता, असं काहीच नाही, सुप्रीम कोर्टाने असं काही सांगितलेलं नाही. सुप्रीम कोर्टाचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काही संबंध नाही आणि कुठल्याही कामकाजावर सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला नाही. त्यामुळे तो विषय नाही, आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करू, असं शिंदेंनी स्पष्ट केलं. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्रिपदाच्या यादीवर चर्चा करायची असतील तर मुंबईत होईल ती दिल्लीत कशाला होईल, असेही शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला आता 20 दिवस उलटले, तरीही मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. अशास्थितीत येत्या 3 ते 4 दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस शुक्रवादी दिल्ली दौऱ्यावर होते. त्यावेळी विस्ताराबाबत वरिष्ठांशी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. अशावेळी शिंदे गटातून किती जणांची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे 40 आणि अपक्ष मिळून 50 आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाला किती आणि कोणती खाती मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.