
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी ईडीच्या (ED) नोटिशीवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला अजून नोटिस आली नाही. ठीक आहे परत आल्यावर पाहू काय ते. आम्ही कायद्याच पालन करणारी लोक आहोत. राजकीय दबावासाठी सर्व चालल आहे. माझा आवाज बंद करण्यासाठी आहे हे सर्व सुरू आहे. संजय राऊत काय आहेत हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना माहित आहेत, असा इशारा देतानाच माझ्यावर किती दबाव आला, कोणत्याही माध्यमातून दबाव आला तरी हा संजय राऊत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेबरोबर राहील. कुणापुढेही गुडघे टेकणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे मला माहीत नाही. मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) का रखडला हे हम दो, हमारे दोच सांगू शकतील. आज एक महिना होत आला आहे. अजून काय होईल मला माहिती नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटायला गेले. लिलाधर डाके, मनोहर जोशी हे लोक बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत कडवट शिवसैनिक म्हणून अनेक वेळा शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. डाके आणि जोशी यांच्याकडे शिकण्यासारखे आहे. अशा कडवट शिवसेनेकांना मुख्यमंत्री भेटले. ते नक्कीच त्यांच्यापासून प्रेरणा आणि बोध घेतील, असं राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री राज्याचा दौरा करतात ही चांगली गोष्ट आहे. राज्यातील जनतेसाठी ही चांगली गोष्ट आहे. राज्यात महापूर आहे. लोक वाहून गेले आहेत. शंभराच्यावर लोकांचा बळी गेला आहे. मोठ्या प्रमाणात शेती वाहून गे लेली आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार देखील विदर्भात आहेत, असं ते म्हणाले. अजून महाराष्ट्रात मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकलेली नाही.दिल्लीमध्ये वाऱ्या आणि फेऱ्या वाढलेल्या आहेत. त्यातून वेळ काढून जर राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेचा प्रश्न समजून घेण्यासाठी फिरणार असतील तर त्याच्यावरती टीका करण्यासारखं काही नाही, असंही ते म्हणाले.
शिंदे गटाने अनेकांच्या पक्षात नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणत्या नियुक्त्या? शिवसैनिक ते इथेच आहेत. हे कोणत्या नियुक्त करत आहेत? त्यांना कोणता अधिकार आहे? हा पोरखेळ चालू आहे. त्याकडे आम्ही फार गांभीर्याने पाहत नाही. आज ही नियुक्ती, उद्या ती, परवा ती नियुक्ती झाली. कोणता पक्ष आहे? आपला संबंध काय इथे. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या सावलीत आपण मोठे झालो. त्याची फळं खाल्ली. आता आपण बाजूला झालेले आहात आणि आता तुमचा पक्ष स्थापन करा आणि तुमचे अस्तित्व दाखवा, असं आव्हानच त्यांनी दिलं.