राष्ट्रवादीचा माजी आमदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

| Updated on: Jan 18, 2020 | 3:36 PM

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे यवतमाळ विधान परिषदेतील मतदार भाजपच्या गळाला लागण्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचा माजी आमदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Follow us on

नागपूर : यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया हे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले (Ex NCP MLA meets Devendra Fadnavis) होते.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे यवतमाळ विधान परिषदेतील मतदार भाजपच्या गळाला लागण्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचा माजी आमदार अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. जिल्ह्याबाहेरील शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने राष्ट्रवादीचा माजी आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.

यवतमाळमधील शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत विधानसभेवर निवडून आल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या 24 जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनाच्या उमेदवारासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही अर्ज भरण्यास उपस्थित होते. यवतमाळ विधानपरिषद निवडणूक आम्ही जिंकू. महाविकास आघाडीच्या कुठल्याही स्थानिक नेत्यांची नाराजी नाही, असं अर्ज भरताना काँग्रेस मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले होते. मात्र संदीप बाजोरिया यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अखेरच्या दिवशी अपक्षांसह 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. भाजपकडून सुमित बाजोरिया, जगदीश वाधवानी यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेचे निष्ठावंत नेते आणि माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी उमेदवारी दाखल केल्याने शिवसेनेत बंडखोरीची चर्चा आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा दुरंगी सामना न राहता चुरशीचा झाला आहे.

विधानपरिषद पोटनिवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, नगरसेवक असे 490 मतदारांची प्रारुप मतदारयादी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली होती. उमरखेड पालिकेतील नगरसेवक अविनाश अग्रवाल यांनी राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली आहे. यामुळे अंतिम मतदारयादीतून एक नाव कमी करण्यात आले आहे. परिणामी, आता 489 मतदार विधान परिषद पोटनिवडणुकीत मतदान करणार आहे.

शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी कोण आहेत?

  • दुष्यंत चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला
  • दुष्यंत चतुर्वेदी हे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव आहेत
  • सतीष चतुर्वेदी हे विदर्भाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. ते 25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री होते
  • दुष्यंत चतुर्वेदी सध्या त्यांच्या शैक्षणिक संस्थांचं काम पाहण्यासोबतच सामाजिक कामांमध्येही व्यस्त असतात.
  • वडील सतीष चतुर्वेदी यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं.
  •  विदर्भात सतीष चतुर्वेदी यांचा मोठा जनसंपर्क आहे.

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील पक्षीय बलाबल

  • भाजप – 147
  • शिवसेना – 97
  • काँग्रेस – 92
  • राष्ट्रवादी काँग्रेस- 51
  • प्रहार – 18
  • इतर –
  • बसपा – 4
  • एमआयएम – 8

Ex NCP MLA meets Devendra Fadnavis