Mahendra Thorve | अखेर शिंदे गटातील खदखद बाहेर, मंत्री भुसेंना जाब विचारला, आमदाराने सांगितलं विधिमंडळातल सत्य
Mahendra Thorve | बाचाबाची झाल्यानंतर या वादामागे नेमकं काय कारण आहे? ते स्पष्ट झालं नव्हतं. पण आता या वादात ज्या आमदाराच नाव आलं महेंद्र थोरवे, त्यांनी काय घडलं ते स्पष्टपणे सांगितलं. महेंद्र थोरवे हे कर्जतचे आमदार आहेत.

मुंबई (गिरीश गायकवाड) : आज विधिमंडळाच्या आवारात शिंदे गटाचे दोन आमदार भिडल्याच वृत्त आलं होतं. एकनाथ शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याच वृत्त होतं. नाशिक जिल्ह्यातून येणारे मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीमध्ये धक्काबुक्की झाली होती. हा प्रकार पत्रकारांना समजल्यानंतर शिंदे गटाकडून सारवासारव करण्यात आली. त्यावेळी या वादामागे नेमकं काय कारण आहे? ते स्पष्ट झालं नव्हतं. पण आता या वादात ज्या आमदाराच नाव आलं महेंद्र थोरवे, त्यांनी काय घडलं ते स्पष्टपणे सांगितलं. महेंद्र थोरवे हे कर्जतचे आमदार आहेत.
“दादा भूसे हे उद्धटपणे बोलणारे मंत्री आहेत. ते सगळ्यांशी उद्धटपणे बोलतात. सरपंच असल्यासारखे वागतात. वारंवार पाठपुरावा करुनही दोन महिन्यांपासून माझ्या मतदार संघातील रस्त्यांच काम त्यांनी केलं नाही. बोर्ड मिटिंगमध्ये हा विषय मांडला नाही. मी त्यांना आज जाब विचारला, तेव्हा ते माझ्याशी नीट बोलले नाहीत, मग शाब्दीक बाचाबाची झाली” असं महेंद्र थोरवे यांनी सांगितलं.
‘हे आम्ही खपवून घेणार नाही’
“ते माझ्याशी उद्धटपणे वागले. एका मंत्र्याने असं वागणं चुकीचं आहे. दादा भुसे हे सगळ्यांशीच उद्धटपणाने वागतात. भाजप आणि एनसीपीचे मंत्री हे एकमेकांना संभाळून घेत असतात. पण आमच्याकडे असं होत नाही. मुख्यमंत्री प्रेमाने वागतात, पण मंत्री उद्धटपणे बोलतात, हे आम्ही खपवून घेणार नाही” असं महेंद्र थोरवे यांनी स्पष्टपणे सांगितलं.
संतोष बांगर काय म्हणालेले?
ही वादावादी झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला होता. त्यावेळी बांगर म्हणालेले की, “अशी कुठलीही धक्काबुक्की झालेली नाही. अस काही घडलेलं नाही. आम्ही तिघांनी एकत्र चहा घेतला” “महाराष्ट्राला महान नेत्यांची परंपरा आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगले नेते होते, पण असं कधी घडल नव्हतं” असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. सध्या विधिमंडळाच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यासाठी सर्वच पक्षाचे आमदार विधान भवनात उपस्थित असतात.
