पर्रिकर चारवेळा गोव्याचे मुख्यमंत्री, मात्र एकदाही कार्यकाळ पूर्ण केला नाही!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल म्हणजे 17 मार्च 2019 रोजी निधन झालं. स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि पर्रिकर काळाच्या पडद्याआड गेले. भारतीय राजकारणातील सुसंस्कृत नेता पर्रिकरांच्या रुपाने हरपला. पर्रिकर आपल्या राजकीय कारकीर्दीत चारवेळा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र, त्यांना एकदाही मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. 2002 मध्ये पहिला कार्यकाळ मनोहर पर्रिकर 24 […]

पर्रिकर चारवेळा गोव्याचे मुख्यमंत्री, मात्र एकदाही कार्यकाळ पूर्ण केला नाही!
Follow us on

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल म्हणजे 17 मार्च 2019 रोजी निधन झालं. स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि पर्रिकर काळाच्या पडद्याआड गेले. भारतीय राजकारणातील सुसंस्कृत नेता पर्रिकरांच्या रुपाने हरपला. पर्रिकर आपल्या राजकीय कारकीर्दीत चारवेळा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र, त्यांना एकदाही मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

2002 मध्ये पहिला कार्यकाळ

मनोहर पर्रिकर 24 ऑक्टोबर 2000 रोजी पहिल्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र, त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ 27 फेब्रुवारी 2002 इथपर्यंत म्हणजेच उणापुरा दोन वर्षांचाच राहिला. 2002 साली गोव्याचे तत्कालीन राज्यपाल मोहम्मद फजल यांनी विधानसभा भंग करुन, राज्यात पुन्हा निवडणुकांची शिफारस केली.

2002 मध्ये दुसरा कार्यकाळ

मनोहर पर्रिकर 5 जून 2002 रोजी दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यावेळीही त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. 29 जानेवारी 2005 रोजी भाजपच्या चार आमदारांनी राजीनामा दिला. त्यानंतर पर्रिकर सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे पर्रिकरांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसचे प्रतापसिंह राणे हे पर्रिकरांनंतर गोव्याचे मुख्यमंत्री बनले.

2012 साली तिसरा कार्यकाळ

गोव्यात 2007 साली विधानसभा निवडणुका झाल्या, ज्यात दिगंबर कामत यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसचा सामना पर्रिकरांना करावा लागला. त्यानंतर पर्रिकरांनी पाच वर्षे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पार पाडली. मात्र, 2012 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आमि त्यात 40 पैकी 21 जागा भाजपला मिळाल्या. त्यानंतर मुख्यमंत्रिपदावर मनोहर पर्रिकर बसले. मात्र, 2014 मध्ये केंद्रात भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर, पर्रिकरांनी गोव्याचं मुख्यमंत्रिपद सोडून, केंद्रात संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा तिसरा कार्यकाळही पर्रिकर पूर्ण करु शकले नाहीत.

2017 साली चौथा कार्यकाळ

2017 साली गोव्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मात्र, भाजपला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे संरक्षणमंत्रिपद सोडून पर्रिकरांना पुन्हा गोव्या परतावे लागले. कारण पर्रिकर मुख्यमंत्री असतील, तर आम्ही पाठिंबा देऊ, असे इतर छोट्या पक्षांनी भूमिका घेतली. त्यामुळे पर्रिकर चौथ्यांचा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, याचवेळी त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने गाठलं आणि मग पर्रिकर अखेरपर्यंत कर्गरोगाशी झुंज देत राहिले. ही झुंज अपयशी ठरली आणि 17 मार्च रोजी पर्रिकर यांचं निधन झालं. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चौथा कार्यकाळही पर्रिकर पूर्ण करु शकले नाहीत.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर काळाच्या पडद्याआड