उद्धव ठाकरेंना लिहलेल्या ‘त्या’ पत्रात राज्यपालांनी काही शब्द टाळायला पाहिजे होते- अमित शाह

| Updated on: Oct 18, 2020 | 9:54 AM

महाविकासआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी न दिल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. | Amit Shah on Governor letter

उद्धव ठाकरेंना लिहलेल्या त्या पत्रात राज्यपालांनी काही शब्द टाळायला पाहिजे होते- अमित शाह
Follow us on

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राविषयी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शाह (Amit Shah) यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. मी ते पत्र वाचले आहे. राज्यपालांनी पत्रात लिहलेले काही शब्द टाळायला पाहिजे होते, असे शाह यांनी म्हटले. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी हे भाष्य केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अधिक चांगल्या शब्दांचा वापर करायला पाहिजे होता, अशी मोघम पण सूचक टिप्पणी शाह यांनी केली. त्यामुळे आता यावर राज्यपाल कोश्यारी आणि त्यांची बाजू उचलून धरणारे राज्यातील भाजपचे नेते काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Amit Shah on Governor Bhagat Singh Koshyari letter to CM Uddhav Thackeray)

महाविकासआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी न दिल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा हवाला देत मंदिरे सुरु करण्याची विनंती केली होती. तुम्ही आता ‘सेक्युलर’ झाला आहात का, असा खोचक प्रश्नही त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता. राज्यपालांच्या या पत्राला उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयत पण परखड भाषेत प्रत्युत्तर दिले होते.

राज्यपालांच्या या पत्राविषयी राजकीय नेते आणि अनेक बुद्धिवंतांनीही आक्षेप नोंदवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून लगेच सेक्युलर ठरवून अवहेलना करणार का?, असा थेट सवाल पवार यांनी मोदींना विचारला होता. तसेच राज्यपालांचं हे वागणं संविधानाच्या चौकटीबाहेरचं आहे. या पत्रातील भाषा पाहून तुम्हाला माझ्या म्हणण्याची खात्री पटेल याची मला खात्री आहे. सेक्युलर हा शब्द संवैधानिक आहे. मात्र, दुर्देवाने राज्यपालांनी लिहिलेलं हे पत्रं एखाद्या राजकीय नेत्याच्या भूमिकेत असल्यासारखे लिहिले आहे. संविधानिक मूल्यांचा आदर राखला गेलाच पाहिजे या हेतूने मी तुमच्याशी आणि जनतेशी या पत्राद्वारे संवाद साधत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

Uddhav Thackeray | माझ्या हिंदुत्वाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना रोखठोक उत्तर

उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावरुन डिवचणारं हेच ते राज्यपालांचं पत्र

उद्धव ठाकरे राज्यपालांवर कडाडले, मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मोठे मुद्दे

ये बापू हमारे सेहतके लिये हानिकारक हैं, राज्यपालांना बडतर्फ करा; माकपची मागणी

(Amit Shah on Governor Bhagat Singh Koshyari letter to CM Uddhav Thackeray)