शिंदे गटाचा गुवाहाटीचा दौरा लटकला?, कारण काय? गुलाबराव पाटील म्हणतात…

| Updated on: Nov 20, 2022 | 1:38 PM

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आदर्श आहेत. नितीन गडकरी हे देशात ज्या पद्धतीने विकास कामे करत आहेत.

शिंदे गटाचा गुवाहाटीचा दौरा लटकला?, कारण काय? गुलाबराव पाटील म्हणतात...
शिंदे गटाचा गुवाहाटीचा दौरा लटकला?, कारण काय? गुलाबराव पाटील म्हणतात...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री व आमदार येत्या 21 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार असल्याची चर्चा होती. कामाख्या देवीच्या दर्शनाला शिंदे गट जाणार होता, असं सांगितलं जात होतं. मात्र, आता हा दौरा लटकल्याचं दिसत आहे. येत्या 21 तारखेला हा दौरा होणार नाही. या दौऱ्याबाबतची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याच्या नव्या तारखेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

येत्या 21 तारखेला गुवाहाटीला जाण्याची त्यांची तारीख ठरली होती. पण त्या दिवशी जिल्हा नियोजनाची बैठक असल्याने आम्ही तर जाणार नाही. मला वाटतं पुन्हा नवीन तारीख येईल, अशी माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यात निवडणूक असल्याने माझं जाणं होणार नाही असं मला वाटतं. बघू नवीन तारीख काय मिळते ती, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे 22 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला काही लोक होते. त्यांनी आम्हाला “दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे” असं म्हणून डिवचलं, असं सांगत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्याचवेळी असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल, अशी खूणगाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आमदार होऊ, मंत्री होऊ हे आम्ही कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. तरी देखील विरोधक आमची बदनामी करत आहेत. “बदनाम तो वो होते है जो बदनामी से डरते है. हम तो वो है जिसे बदनामी डरती है” अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

नीलम गोऱ्हे या ठाकरे गटाला सोडून चालल्या होत्या, असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. तसेच दोन दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्या शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चांना गुलाबराव पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर किंवा इतर कामांसाठी त्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली असेल. मात्र कोणत्याही गोष्टीला कोणतेही अर्थ लावणे योग्य होणार नाही, असं सांगत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आदर्श आहेत. नितीन गडकरी हे देशात ज्या पद्धतीने विकास कामे करत आहेत.

त्यामुळे राज्यपाल यांनी त्यांचा उल्लेख शिवाजी महाराजांप्रमाणे केला असेल, असं मला वाटतं. मात्र ही बातमी किती सत्य आहे ते पाहिल्यावरच बोलता येईल, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.