मनसेत पुनरागमन करणाऱ्या हर्षवर्धन जाधवांना राज ठाकरेंची बक्षिसी

| Updated on: Feb 29, 2020 | 6:06 PM

मनसेत नव्याने आलेले हर्षवर्धन जाधव आणि सुहास दशरथे यांना औरंगाबाद जिल्ह्याचं अध्यक्षपद सोपवून नवीन जबादारी देण्यात आली आहे

मनसेत पुनरागमन करणाऱ्या हर्षवर्धन जाधवांना राज ठाकरेंची बक्षिसी
Follow us on

मुंबई/औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पुनरागमन करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी बक्षिसी दिली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हर्षवर्धन जाधवांकडे मनसेच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे फायरब्रँड नेते चंद्रकांत खैरेंवर जाधवांची तोफ धडाधडताना दिसणार आहे. (Harshwardhan Jadhav MNS Responsibility)

नवीन झेंडा आणि नवीन अजेंडा जाहीर केल्यानंतर मनसे आता पक्षाला आलेली मरगळ झटकायला सुरुवात करत आहे. औरंगाबाद निवडणुकीकडे मनसेने लक्ष केंद्रित केलं आहे. मनसे तिथीनुसार शिवजयंती सोहळा औरंगाबादमध्ये साजरा करणार आहे. त्यादृष्टीने औरंगाबादमध्ये मनसेने वातावरणनिर्मितीला सुरुवात केली आहे.

औरंगाबाद निवडणुकीआधी पक्षात्मक बांधणी सुरु आहे. मनसेत नव्याने आलेले हर्षवर्धन जाधव आणि सुहास दशरथे यांना औरंगाबाद जिल्ह्याचं अध्यक्षपद सोपवून नवीन जबादारी देण्यात आली आहे. औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी मनसेने आता बूथ स्तरावर सर्व तयारी केली आहे.

हेही वाचा : ‘मनसे’त मेगाभरती, हर्षवर्धन जाधव आणि पंकजा मुंडेंच्या मामाचा पुनर्प्रवेश

नवीन चेहऱ्यांना संधी देऊन पक्ष वाढवून निवडणुकीत जास्त यश मिळवण्याचा मनसेचा मानस आहे. तर औरंगाबाद महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकेल, असा विश्वास पदाधिकारी व्यक्त करत आहेत. मुंबईतील पदाधिकाऱ्यांनाही या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

मनसेचं महाधिवेशन, महामोर्चा पार पडल्यानंतर राज ठाकरे यांनी आपला मोर्चा औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेकडे वळवला आहे. मनसेने औरंगाबाद महापालिकेकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं आहे. शिवसेना महाविकास आघाडीत गेल्याने मनसेने ही संधी हेरुन सेनेचे मुद्दे हायजॅक केले आहेत. औरंगाबादचं नाव ‘संभाजीनगर’ करा, ही मागणी केल्यानंतर आता मनसे औरंगाबादमध्ये तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार आहे. स्वतः राज ठाकरे या कार्यक्रमाला हजर राहणार असल्याने भव्यदिव्य असा हा कार्यक्रम असेल.

मनसेला 14 वर्ष पूर्ण होत आहेत. पण याकाळात म्हणावं तसं यश मनसेला मिळालं नाही. त्यामुळे आता मनसे पुन्हा पक्षाला उभारी आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवसेनेची मतं आपल्याकडे वळवण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. शिवसेना महाविकास आघाडीत गेल्याने सेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परंतु औरंगाबाद महापालिकेत मनसेला किती यश मिळतं, हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (Harshwardhan Jadhav MNS Responsibility)