विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली? त्यांनी शपथ घेऊन सांगावं : हसन मुश्रीफ

| Updated on: Oct 22, 2020 | 3:58 PM

"विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली हे त्यांनी शपथ घेऊन सांगावं", असं आव्हान अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मिश्रीफ यांनी दिलं आहे (Hasan Mushrif Slams BJP).

विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली? त्यांनी शपथ घेऊन सांगावं : हसन मुश्रीफ
Follow us on

अहमदनगर : “विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली हे त्यांनी शपथ घेऊन सांगावं”, असं आव्हान अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मिश्रीफ यांनी दिलं आहे. मुश्रीफ यांनी आज (22 ऑक्टोबर) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील भागाची पाहणी केली. यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली (Hasan Mushrif Slams BJP).

“आम्ही अनेक वर्ष राज्य कारभार केला आहे. जनतेला मदत कशी मिळवून द्यायची ते आम्हाला चांगलं माहित आहे. आमची जनतेशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे आता आम्ही काय करावं, हे त्यांनी आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही”, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला (Hasan Mushrif Slams BJP).

“नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केल्याशिवाय मदत देता येत नाही. पंचनामे केल्याशिवाय सरकारला किती मदत द्यायची, याचे आकलन होत नाही. विशेष म्हणजे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावे, असा केंद्र सरकारचादेखील आग्रह असतो”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

“गेल्या वर्षी कोल्हापूरला महापूर आला तेव्हा सहा दिवसांनी देवेंद्र फडणवीस आले होते. ते मुख्यमंत्री होते. त्यावेळेस सांगली-कोल्हापुरात त्यांच्याविरोधात जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपची एकही जागा कोल्हापूर जिल्ह्यात निवडून आली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वतः कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली”, असा चिमटा मुश्रीफ यांनी काढला.

शेतकऱ्यांच्या संतप्त जमावाने हसन मुश्रीफांची गाडी रोखली

दौऱ्यादरम्यान हसन मुश्रीफ यांना आज (22 ऑक्टोबर) शेतकऱ्यांच्या संतप्त जमावाला तोंड द्यावे लागले. या शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांची गाडी रस्त्यात अडवून सडलेला कांदा आणि इतर पिके त्यांच्यासमोर धरली. आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकरी करत होते. यावर हसन मुश्रीफ यांनी आठ दिवसांत तुम्हाला नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

काही दिवसांपूर्वीच हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना भरघोस मदत देणारे पॅकेज देऊ, असे वक्तव्य केले होते. केंद्राने 20 लाख कोटी जाहीर केलं मात्र हे कसलं पॅकेज आहे? सगळं कर्जच आहे. पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा नाही. आमचं महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असं मोठं पॅकेज देईल की यांचे (भाजपचे) डोळे पांढरे होतील, असा दावा मुश्रीफ यांनी केला होता.

दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी येत्या एक-दोन दिवसांत आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द झाली होती. त्यामुळे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पॅकेजसंदर्भात घोषणा होऊ शकते.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 3 हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणेची शक्यता

आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील : हसन मुश्रीफ