अचानक निर्णय का बदलला? बंडखोर संतोष बांगर म्हणतात, नो कॉमेंट्स! हिंगोलीत आगमन, कडेकोट सुरक्षा

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर आधी संतोष बांगर यांनी तीव्र शब्दात टीका केली होती. मात्र शिंदे यांच्या बहुमत चाचणीच्या दिवशी संतोष बांगर यांनी अचानक निर्णय बदलला आणि एकनाथ शिंदेंच्या गटात ते शामिल झाले.

अचानक निर्णय का बदलला? बंडखोर संतोष बांगर म्हणतात, नो कॉमेंट्स! हिंगोलीत आगमन, कडेकोट सुरक्षा
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 12:53 PM

हिंगोलीः हिंगोलीतून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात शामिल झालेले शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचं नुकतंच शहरात आमगन झालं. शिवसेना कार्यकर्त्यांनी (Shivsena Activists) त्यांच्या स्वागतासाठी औंढा नागनाथ शहरात मोठी बॅनरबाजी केली. बांगर यांच्या आगमनाच्या वेळी शिवसैनिकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. हिंगोलीत येताच आमदार संतोष बांगर तत्काळ कामावर रूजू झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच राहणार, असं ठणकावून सांगणाऱ्या संतोष बांगर यांनी ऐनवेळी बहुमत चाचणीच्या दिवशी एकनाथ शिंदेंच्या बाजूने मतदार केले. त्यामुळे संपूर्ण राज्यातून आश्चर्य व्यक्त केलं गेलं. ऐनवेळी निर्णय बदलण्यामागचं कारण विचारलं असता संतोष बांग यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.

औंढा नागनाथमंध्ये बॅनरबाजी

एकनाथ शिंदे यांच्या बहुमत चाचणीसाठी ऐनवेळी विधानसभेत पोहोचलेले संतोष बांगर दोन दिवसांपासून मुंबईतच ठाण मांडून होते. आज बुधवारी ते स्वतःच्या मतदारसंघात परतले. यावेळी शिनसैनिकांनी मोठी बॅनरबाजी केली. हिंदु हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हिंदुत्वांचा आणि विचारांचा हुंकार तुम्ही आहात दादा.. सदैव आपल्या सोबत अशा आशयाचे बॅनर्स संतोष बांगर यांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आले. औंढा नागनाथसह हिंगोली शहरातही बांगर यांच्या समर्थनाचे हे बॅनर्स झळकवण्यात आले.

कार्यालयाभोवती कडेकोट पहारा

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या राज्यभरातील शिवसेना आमदारांमुळे महाविकास आघाडी सरकारचं संख्याबळ कमी झालं. राज्यात मोठं सत्तांतर घडलं. या सर्व पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांना केंद्र सरकार तसेच राज्य सरकारतर्फे सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. हिंगोलीतील आमदार संतोष बांगर यांनाही वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या ऑफिसबाहेर सुरक्षा जवानांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बंडखोरी आधीचं वक्तव्य चर्चेत

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर आधी संतोष बांगर यांनी तीव्र शब्दात टीका केली होती. बंडखोर आमदारांच्या बायका म्हणतील, ज्या पक्षानं यांना मोठं केलं, त्यांनाच सोडून गेले. मला कधी सोडतील याचा नेम नाही. बंडखोरांच्या मुलांचे लग्नदेखील होणार नाही. त्यांच्या मुलांना कोण बायको देणार, त्यांना रस्त्यानं फिरणंही कठीण होईल, असं वक्तव्य बांगर यांनी केलं होतं. मात्र शिंदे यांच्या बहुमत चाचणीच्या दिवशी संतोष बांगर यांनी अचानक निर्णय बदलला आणि एकनाथ शिंदेंच्या गटात ते शामिल झाले.