मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही: अशोक चव्हाण

| Updated on: Jan 23, 2021 | 7:53 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम उत्तम सुरु आहे. मला आघाडीत बिघाडी करायची नाही. | Ashok Chavan

मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही: अशोक चव्हाण
काँग्रेस नेते अशोक चव्हाण
Follow us on

नांदेड: मला मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या एका वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीची चर्चा सुरु झाली आहे. (Congress leader Ashok Chavan on CM Post)

या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी भोकरमधील एका कार्यक्रमात भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम उत्तम सुरु आहे. मला आघाडीत बिघाडी करायची नाही. त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाण यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय काढायचा, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे आता यावरुन सत्ताधारी आणि विरोधी गोटात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांनी माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. माझ्या वक्तव्यात फेरफार करुन त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले…?

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी जास्त संख्याबळाची, पक्षवाढीची गरज असते. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. मला हे माहितीय की आमच्याकडे 54 आमदार आहे. 54 आमदारांचा कसा मुख्यमंत्री होणार? त्यासाठी पक्षवाढीची अतोनात गरज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं.

अजित पवारांचा जयंत पाटलांना पाठिंबा

जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेविषयी प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना विचारले. त्यावेळी अजितदादांनी आपला जयंत पाटील यांना पाठिंबा असल्याचे सांगितले. जयंत पाटील साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, त्या इच्छेला मी पाठिंबा देतो, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली.

‘जयंत पाटील यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा, त्यात गैर काय?’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जयंत पाटील यांची पाठराखण केली होती. राजकीय जीवनात काम करत असताना इच्छा आकांक्षा असतात. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर अजितदादा बोलले आहेत. त्यांनी त्यांच्या इच्छेला पाठिंबा दिला आहे. आपल्या विचारांचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं… त्यात गैर काय?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता.

संबंधित बातम्या:

जयंत पाटील म्हणतात, मला मुख्यमंत्री व्हायचंय, अजित पवार म्हणाले….

मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

जयंत पाटलांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की दिवास्वप्न ठरणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट

(Congress leader Ashok Chavan on CM Post)