फडणवीसांच्या मर्जीतील अधिकारी प्रवीण दराडेंची बदली, महापौरांना बंगला न देणं अंगलट?

| Updated on: Jan 17, 2020 | 8:26 AM

राज्यात ठाकरे सरकार स्थापन होताच प्रवीण दराडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे या बदलीला हा बंगलाच कारणीभूत असल्याची चर्चा महापालिका मुख्यालयात आहे

फडणवीसांच्या मर्जीतील अधिकारी प्रवीण दराडेंची बदली, महापौरांना बंगला न देणं अंगलट?
Follow us on

मुंबई : सत्तापालट झाल्यानंतर मर्जीतील अधिकाऱ्यांना बढती आणि विरोधात गेलेल्या अधिकाऱ्यांची बदली हा प्रकार काही नवीन नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची पुण्यात समाजकल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली (Praveen Darade Transfer) करण्यात आली आहे.

आयएएस अधिकारी प्रवीण दराडे यांनी फडणवीस सरकारच्या काळात आपला शासकीय बंगला महापौर निवासस्थानासाठी न दिल्याने त्यांची बदली झाल्याची चर्चा रंगली आहे.

भाजप सरकारच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर प्रवीण दराडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी पल्लवी दराडे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर असताना मलबार हिलमधील पालिका जल अभियंत्याचा बंगला त्यांना राहण्यास देण्यात आला होता.

शिवाजी पार्कमधील महापौर निवास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळासाठी दिलं गेल्याने तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना मलबार हिलमधील दराडे कुटुंब राहत असलेला बंगला देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र हा बंगला रिकामा करण्यास दराडे कुटुंबियांनी नकार दिला होता.

आता, राज्यात ठाकरे सरकार स्थापन होताच प्रवीण दराडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे या बदलीला हा बंगलाच कारणीभूत असल्याची चर्चा महापालिका मुख्यालयात आहे. पल्लवी दराडे आता अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त आहेत. त्यामुळे दराडेंचा बंगला रिकामा (Praveen Darade Transfer) होण्याचा मार्ग रिकामा झाला आहे.

याशिवाय, के. एच. गोविंदराज यांची एमएमआरडीएच्या अतिरक्त महानगर आयुक्तपदी, असिमकुमार गुप्ता यांची ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवपदी, तर विक्रीकर आयुक्त राजीव जलोटा यांची ग्रामविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे.