यशवंत जाधव ऑडिओ क्लिपवरुन वातावरण तापलं, मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप नगरसेवकांचा राडा

| Updated on: Dec 04, 2020 | 5:10 PM

स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ऑडिओ क्लिपवरुन आज मुंबई महापालिकेत राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

यशवंत जाधव ऑडिओ क्लिपवरुन वातावरण तापलं, मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप नगरसेवकांचा राडा
Follow us on

मुंबई :  मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते यशवंत जाधव एका कंत्राटदाराला धमकावत असल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.  यशवंत जाधव यांच्या ई वॉर्डमध्ये या कंत्राटदाराला कंत्राट मिळालं होतं. पण ते कंत्राट मागे घेण्यासाठी जाधव धमकीवजा इशारा देत असल्याचं या क्लिपमधून ऐकायला मिळालं. या ऑडिओ क्लिपचे पडसाद आज (शुक्रवार) मुंबई महापालिकेत उमटलेले पाहायला मिळाले. महापालिकेत भाजप आणि शिवसेना सदस्य एकमेकांमध्ये चांगलेच भिडले. (in BMC Dispute between BJP And Shivsena Carporater over Shiv Sena Leader Yashwant Jadhav Audio Clip)

स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ऑडिओ क्लिपवरुन आज महापालिकेत राडा झाला. यशवंत जाधव यांच्याविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. स्थायी समितीत या विषयाचा हरकतीचा मुद्दा घेऊ न दिल्यानं भाजप नगरसेवकांनी गोंधळ घालत जाधव यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

यशवंत जाधव यांच्या दालनासमोर भाजप नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन धरलं. याचदरम्यान शिवसेनेचे काही नगरसेवक जाधव यांच्या दालनाजवळ आले. भाजप-शिवसेना नगरसेवक आमनेसामने आल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी दोन्हीही पक्षाचे नगरसेवक हमरीतुमरीवर आले.

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची दादागिरी गेली अनेक वर्ष सुरु आहे. चांगलं काम होऊ न देणे तसंच अनेकांना धमकावणं, ही शिवसेनेची पद्धत आहे, असा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. तर हे आरोप फेटाळून लावत भाजपने केलेले आरोप राजकीय द्वेषापोटी केलेले आहेत. आम्ही चांगलं काम करत आहोत मात्र कोणत्याही कामात आडवा पाय घालण्याची भाजपची जुनी पद्धत आहे, असं प्रत्युत्तर शिवसेना नगरसेवकांनी दिलं.

नेमकं काय आहे प्रकरण

मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते यशवंत जाधव एका कंत्राटदाराला धमकावत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. कंत्राट मागे घेण्यासाठी जाधव धमकीवजा इशारा देत असल्याचं या क्लिपमधून ऐकायला मिळालं. “तुम्हाला मेसेज मिळाला नाही काय, सिस्टीम समजत नाही का? माझ्या एरियात काम करतो आहेस. कंत्राट मागे घे नाहीतर बघून घेईन, असा धमकीवजा इशारा जाधव कंत्राटदाराला देत असल्याचं दिसत आहे. तुला काम करायचं की नाही, तू जिथे राहतो तिथे येऊ तुला सांगतो, असंही त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

धमकी देण्याचा प्रश्न नाही, कंत्राटदाराचं काम चांगलं नाही

मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी टीव्ही 9 मराठीवर स्पष्टीकरण दिलं आहे. “यात धमकी देण्याचा काही प्रश्न नाही. प्रभागात 7 नगरसेवक असताना माझ्या विभागातच त्याने टेंडर भरलं. टेंडर नियमाप्रमाणे लागल्यानंतर कंत्राटदाराच्या बाबतीत माहिती घेणं माझं काम आहे. कंत्राटदाराने आधीची केलेली कामं बरोबर नसल्याचं मला समजलं, याची मला माहिती मिळाली. तुम्हाला काम करायचं असेल तर फोनवर बोलणं योग्य नाही. फोनवर कोणत्याही अशा कामाबद्दल बोलता येणार नाही. त्या कंत्राटदारानं माझ्याशी चुकीची वार्ता केली. तो टक्केवारीबद्दल बोलत होता. अशा पद्धतीनं बोलणं चांगलं नाही. कोणाशी बोलताय हे लक्षात घ्या”, असा खुलासाही यशवंत जाधवांनी केला आहे. विशेष म्हणजे यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत.

संबंधित बातम्या

कंत्राट मागे घे नाहीतर बघून घेईन, शिवसेना नेते यशवंत जाधवांची ऑडिओ क्लिप व्हायरल