ज्या नेहरूंच्या अलिप्तवादावर टीका केली, त्याच नेहरूंच्या धोरणाने मोदींना वाचवले; राऊतांच्या ‘रोखठोक’ कानपिचक्या

| Updated on: Mar 06, 2022 | 7:27 AM

रशिया- युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंडित नेहरूंनी त्यांच्या काळात विदेश मंत्रालय एक 'स्वतंत्र इन्स्टिट्यूशन'प्रमाणे विकसित केले.

ज्या नेहरूंच्या अलिप्तवादावर टीका केली, त्याच नेहरूंच्या धोरणाने मोदींना वाचवले; राऊतांच्या रोखठोक कानपिचक्या
ज्या नेहरूंच्या अलिप्तावादावर टीका केली, त्याच नेहरूंच्या धोरणाने मोदींना वाचवले; राऊतांच्या 'रोखठोक' कानपिचक्या
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: रशिया- युक्रेनमधील युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्यावर टीका केली आहे. पंडित नेहरूंनी त्यांच्या काळात विदेश मंत्रालय एक ‘स्वतंत्र इन्स्टिट्यूशन’प्रमाणे विकसित केले. आंतरराष्ट्रीय राजकारण, इतिहासाचे भान आणि भारतीय गुटनिरपेक्षता म्हणजे स्वतंत्र, अलिप्त भूमिकेची एक महान परंपरा आपल्या विदेश मंत्रालयास लाभली आहे, पण विदेश मंत्रालयाच्या डोक्यावर आता काळी टोपी व अंधभक्तीचा प्रभाव दिसत आहे. ज्या नेहरूंच्या अलिप्तवादावर मोदी टीका करीत राहिले तोच अलिप्तवाद त्यांना रशिया-युक्रेन वादात ‘युनो’मध्ये स्वीकारावा लागला! नेहरूंच्या धोरणानेच पंतप्रधान मोदींना वाचविले, अशा कानपिचक्या संजय राऊत यांनी दिल्या आहेत. राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदरातून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.

युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले. त्यांना आणण्यासाठी सरकारला चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवावे लागले. दोन विद्यार्थी या युद्धात मरण पावले व शेकडो विद्यार्थ्यांना नरकयातना भोगत पायपीट करावी लागली. ”भारत सामर्थ्यवान असल्यामुळेच आपल्या विद्यार्थ्यांची रशिया-युक्रेन सीमेवरून सुटका होऊ शकली!” असे प्रचारकी भाषण पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत केले. सत्य असे आहे की, हजारो विद्यार्थ्यांना पहिले आठ दिवस वालीच नव्हता. उपाशी, चालत शेकडो मैल ही मुले पोलंड, रूमानिया, स्लोव्हाकियाच्या सीमेवर बेवारस अवस्थेत उभी होती. त्यांच्या आक्रोशाने येथे संतापाच्या ठिणग्या पडू लागल्या तेव्हा सरकारला हालचाल करावी लागली. ‘विदेश मंत्रालय’ या काळात नेमके काय करीत होते?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

तर लोक दारू पिऊ लागतात

पुतीन यांनी त्यांचा देश स्टालिनच्या काळात नेऊन ठेवला. स्टालिनच्या काळापासून रशियन लोकांवर एक मोठा परिणाम झाला, तो मुकेपणाचा. बोलण्याचे स्वातंत्र्य नसले की लोक दारू पिऊ लागतात. रशियात आज तेच घडत आहे. रशिया-युक्रेन युद्ध ही पुतीन यांची खाज आहे. चर्चेतून मार्ग काढता आला असता, पण पुतीन यांनी सरळ युद्धच पुकारले. शेकडो माणसे, सैनिक, लहान मुले मारली गेली. लोकांनी कष्टाने उभारलेली घरे, संस्था, उद्योग नष्ट झाले. एक संपूर्ण देशच संपला व लोक निर्वासित झाले, पण जागतिक मंचावर प्रत्येकजण राजकीय भूमिका वठवताना दिसत आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

पुतीन येतील आणि पुतीन जातील

आर्मेनियाच्या सीमेवर आज निर्वासितांचे सगळ्यात जास्त लोंढे आहेत. त्यात भारतीय विद्यार्थीसुद्धा आहेत. रशियातून आर्मेनिया फुटून निघाला, पण 7 डिसेंबर 1988 रोजी आर्मेनियात फार मोठा भूकंप झाला. 35 हजार लोक या भूकंपामुळे मृत्यू पावले. 8 लाखांवर बेघर झाले. गोर्बाचेव्ह तेव्हा युनोत होते. तेथून ते परत आले. 75 खेडी, 19 लहान-मोठी शहरे त्यात उद्ध्वस्त झाली, परंतु या भयंकर नैसर्गिक आपत्तीने एक झाले. सबंध जग आर्मेनियाच्या मदतीस धावले. आर्मेनिया नंतर रशियाचा भाग राहिला नाही. तो जगाचा झाला. राजकीय तत्त्वज्ञान, धर्म, देशोदेशीचे राजकारण हे सारे त्या आपत्तीने मोडीत काढले. उरले ते फक्त माणसाचे माणसाशी असलेले नाते आणि म्हणूनच आर्मेनियाच्या जनतेने जगाचे नंतर आभार मानले ते शब्द फार मोलाचे आहेत :- ‘Thank you people of the earth, we are children of one planet and nature!’ आपत्तीतून सुचलेला हा चिरंतन विचार शांततेच्या काळात सर्वांनी लक्षात ठेवला तर या पृथ्वीवरच्या माणसाला सहज सुखाने जगता येईल. मग तो कोणत्याही रंगाचा, धर्माचा व देशाचा असो, तो सुखी होऊ शकेल. एक दिवस युक्रेनही पुन्हा राखेतून झेप घेईल. पुतीन येतील आणि पुतीन जातील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

PM Modi In Pune: पुण्यात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ना मुख्यमंत्री ना आदित्य ठाकरे, सुभाष देसाई हजेरी लावणार, कारण काय?

Modi In Pune: पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच तास पुण्यात, संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

Video: पवार म्हणाले राणेंनाही अटक झाली होती, 9 तासाच्या चौकशीनंतर नारायण राणेंनी पवारांना आठवणीनं उत्तर दिलं