Nathuram Godse : …आणि सावरकरप्रेमी संतापले! नथुराम गोडसे यांच्या समर्थनात का केली घोषणाबाजी?

नाटकाच्या प्रयोगादरम्यान वाद इतका वाढला की पोलिसांना मध्ये पडावं लागलं! पाहा, नेमकं काय घडलं?

Nathuram Godse : ...आणि सावरकरप्रेमी संतापले! नथुराम गोडसे यांच्या समर्थनात का केली घोषणाबाजी?
नव्या वादाला तोंड
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Nov 16, 2022 | 10:18 AM

अहमदनगर : हर हर महादेव सिनेमात (Har Har Mahadev) चुकीचा इतिहास (History) दाखवला गेल्यावरुन गदारोळ सुरु आहे. अशातच आता आणखी एका कलाकृतीतून चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. हा प्रकार राज्य नाट्य स्पर्धेदरम्यान घडलाय. 61व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेदरम्यान नाटकाच्या प्रयोगावेळी चांगलाच राडा झाला. नाटकातील प्रसंगांवर आक्षेप नोंदवत काही जणांनी चक्क नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांच्या समर्थनात घोषणा दिल्यात. या प्रकाराने नाट्यगृहात एकच गोंधळ झाला होता. हा गोंधळ इतका वाढला की अखेर पोलिसांना मध्ये पडावं लागलं. चालू नाटकाचा प्रयोग बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यामुळे नाट्यगृहात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.

राज्य नाट्य स्पर्धेत मी पण नथुराम बोलतोय या नाटाकाचा प्रयोग सादर केला जात होता. या नाटकाच्या सादरीकरणावेळी काहींनी गोंधळ घातला. नाटकावर आक्षेप नोंदवत काहींनी घोषणा केली.

‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकामध्ये स्वातंत्र्यवीर सावकर यांची प्रतिमा चुकीची दाखवल्याचा दावा सावकर प्रेमी यांनी केला. त्यामुळे नाटक संपण्याच्या तयारीत असतानाच सावरकर प्रेमी सभागृहात उभे राहिले आणि त्यांनी हे नाटक बंद करा, अशी मागणी केली.

सावरकर प्रेमींच्या वतीने उत्कर्ष गीते आणि अमोल हुबे पाटील यांनी नाटकाला विरोध करण्यामागची भूमिकाही मांडली. या नाटकात चुकीच्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा उभी करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ सारख्या नाटकाचे प्रयोग राज्यात कुठेही होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, याबाबत देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर हा प्रकार घालणार असल्याचयही सावरकर प्रेमींच्या वतीने सांगण्यात आलं.