शिवसेनेचे ‘संकटमोचक’ आणि ठाकरेंचे विश्वासू; वाचा, अनिल परब यांचा पॉलिटिकल ग्राफ!

शिवसेनेवर जेव्हा जेव्हा काही राजकीय संकट येतं तेव्हा तेव्हा शिवसेनेचे दोन नेते नेहमीच पुढे येऊन त्याचा मुकाबला करतात. (know about shiv sena’s mastermind Anil Parab)

शिवसेनेचे 'संकटमोचक' आणि ठाकरेंचे विश्वासू; वाचा, अनिल परब यांचा पॉलिटिकल ग्राफ!
अनिल परब, परिवहन मंत्री.

मुंबई: शिवसेनेवर जेव्हा जेव्हा काही राजकीय संकट येतं तेव्हा तेव्हा शिवसेनेचे दोन नेते नेहमीच पुढे येऊन त्याचा मुकाबला करतात. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि परिवनह मंत्री अनिल परब हे ते दोन नेते आहेत. शिवसेनेचे संकटमोचक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणूनही त्यांची ओळख आहे. कसा आहे परब यांचा शिवसेनेतील प्रवास त्याविषयीची ही माहिती. (know about shiv sena’s mastermind Anil Parab)

कौटुंबीक माहिती

अॅड. अनिल दत्तात्रय परब यांचं शिक्षण बी.कॉम, एलएलबीपर्यंत झालं आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभूत्त्व आहे. पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे.

सामाजिक कार्य

शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप, गरीब रुग्णांना सर्वतोपरी मदत, दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव कार्यक्रमांचे आयोजन, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीरांचे आयोजन, सामान्य माणसांना कायदेविषयक मोफत सल्ला, विविध क्रीडा स्पर्धांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, बांद्रा येथील शासकीय वसतीगृहाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न, स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन; 2001 पासून शिवसेना विभाग प्रमुख, पक्षाच्या कायदेविषयक कामाची जबाबदारी, पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग आदी विविध सामाजिक कार्य त्यांनी केलं आहे.

विद्यार्थी सेनेपासून सुरुवात

परब हे शिवसेना नेते, माजी खासदार, दिवंगत मधुकर सरपोतदार यांच्या अत्यंत जवळचे होते. ते गेल्या 20 वर्षांपासून ते शिवसेनेत सक्रिय आहेत. शिवसेनेचे विभागप्रमुख ते परिवहन मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

2017पासून प्रकाशझोतात

परब हे शिवसेनेत कार्यरत होते. पण 2017मध्ये ते अधिक चर्चेत आले. 2017च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती तुटली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी या निवडणुका स्वबळावर लढवल्या. त्यावेळी परब यांनी भाजपचा प्रत्येक हल्ला परतवून लावत महापालिका निवडणुकीसाठी संपूर्ण मुंबई पिंजून काढली होती. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पालिकेतील भ्रष्टाचारावरून घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी परब यांनी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर भाजपला सडेतोड उत्तर दिलं होतं. या निवडणुकीनंतर परब यांची पक्षातील प्रतिमा अधिकच उंचावली होती.

3 वेळा विधानपरिषदेवर

अनिल परब यांच्या कामाची दखल घेऊन शिवसेनेने त्यांची तीन वेळी विधानपरिषदेवर वर्णी लावली. 2004-2010, 2012-2018 आणि जुलै 2018मध्ये त्यांची विधानपरिषदेवर फेरनिवड करण्यात आली होती. विधान परिषदेत अत्यंत अभ्यासूपणे शिवसेनेची बाजू लावून धरतानाच विरोधकांना सळो की पळो करून सोडण्याचं कामही त्यांनी केलं होतं. दिवाकर रावते आणि रामदास कदम या दोन ज्येष्ठ नेत्यांना डावलून परब यांनी विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती. यावरून परब हे मातोश्रीच्या किती जवळ आहे हे लक्षात येतं.

प्रत्येक निर्णयात सहभाग

अनिल परब यांचंही शिवसेनेतील स्थान मोठं आहे. शिवसेनेचे संकटमोचक म्हणूनही परब यांच्याकडे पाहिलं जातं. शिवसेनेच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात परब यांचं मत जाणून घेतलं जातं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कातील स्मारकामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तेव्हाही परब यांनीच त्यावर तोडगा काढला होता. शिवसेनेची रणनीती ठरवण्यामध्ये परब यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आताही उद्धव ठाकरे यांनी परब-देसाई यांचा सल्ला घेऊनच राठोड यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी

2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परब यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. परब यांच्याकडे वांद्रे पश्चिम, खेरवाडी, विलेपार्ले, वर्सोवा, अधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम आणि चांदिवली या सात मतदारसंघांची जबाबादारी देण्यात आली होती. हे सातही मतदारसंघ त्यांनी पिंजून काढून युतीच्या उमेदवारांना बळ दिलं होतं. (know about shiv sena’s mastermind Anil Parab)

प्रभू, वायकरांना डावलून मंत्रिमंडळात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात आघाडी सरकार आल्यानंतर ठाकरे मंत्रिमंडळात आमदार सुनील प्रभू आणि रवींद्र वायकर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता होती. प्रभू हे मुंबईचे माजी महापौर होते आणि विधानसभेती पक्षाचे मुख्य प्रतोदही होते. त्यांनी फडणवीस यांच्या काळात विधासनभेत चांगलं काम केलं होतं. तर, रवींद्र वायकर हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. शिवाय वायकर हे मातोश्रीच्या जवळचे असल्याने त्यांची कॅबिनेटपदी वर्णी लागेल असं बोललं जात होतं. मात्र, या दोन्ही नेत्यांना डावलून विधानपरिषद गाजवणाऱ्या परब यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. त्यांची थेट परिवहन मंत्रीपदी वर्णी लागली. (know about shiv sena’s mastermind Anil Parab)

संबंधित बातम्या: 

71 कोटींचा बँक घोटाळा; वाचा, कोण आहेत आमदार अनिल भोसले!

पाचवेळा आमदार, तरीही पक्षातच ‘उपरे’ ठरविले गेले; वाचा, प्रकाश भारसाकळेंचा संघर्ष

विद्यार्थी नेता ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते; वाचा, प्रवीण दरेकर यांच्या आयुष्यातील ‘खाचखळगे’!

‘अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण’ ते ‘शिवसेनेची रणरागिणी’, कोण आहेत नीलम गोऱ्हे?; वाचा सविस्तर

ठाकरे कुटुंबीयांसोबत जमीन खरेदीत भागिदारी?; कोण आहेत रवींद्र वायकर वाचा सविस्तर!

प्रवीण दरेकरांमुळे पुन्हा चर्चेत आलेलं मुंबै बँक घोटाळा प्रकरण काय आहे?, काय आहेत दरेकरांवर आरोप; वाचा स्पेशल रिपोर्ट

डोक्यात पंप हाणू म्हणणाऱ्या आमदार राम सातपुतेंवर स्पेशल रिपोर्ट; वाचा सविस्तर!

(know about shiv sena’s mastermind Anil Parab)

Published On - 5:56 pm, Tue, 9 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI