कोल्हापूरच्या महापौरांचा राजीनामा, सुरमंजिरी लाटकर सव्वादोन महिन्यात पायउतार

| Updated on: Jan 30, 2020 | 3:45 PM

राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुरमंजिरी लाटकर यांची 19 जानेवारी 2019 रोजी कोल्हापूरच्या महापौरपदी निवड झाली होती.

कोल्हापूरच्या महापौरांचा राजीनामा, सुरमंजिरी लाटकर सव्वादोन महिन्यात पायउतार
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौर अॅड. सुरमंजिरी लाटकर यांनी राजीनामा (Kolhapur Mayor Resign) दिला आहे. महापालिकेच्या विशेष सभेत लाटकरांनी राजीनामा दिला. अवघ्या सव्वादोन महिन्यात सुरमंजिरी लाटकर पदावरुन पायउतार झाल्या आहेत. खांदेपालट होऊन कोल्हापूरचे महापौरपद आता काँग्रेसकडे जाणार आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुरमंजिरी लाटकर यांची सव्वादोन महिन्यांपूर्वी म्हणजेच 19 जानेवारी 2019 रोजी कोल्हापूरच्या महापौरपदी निवड झाली होती. लाटकर या कोल्हापूरच्या 49 व्या महापौर होत्या.

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा असताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाआघाडी करत पहिला विजय कोल्हापुरात मिळवला होता. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची गेल्या चार वर्षापासून इथे आघाडी आहे.

सुरमंजिरी लाटकर यांनी भाजपच्या भाग्यश्री शेटके यांचा 11 मतांनी पराभव केला होता. महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीला शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित राहिले होते.

कोल्हापूर महापालिकेत ताराराणी आघाडीच्या माध्यमातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचं वर्चस्व होतं. मात्र पक्षीय राजकारण आल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघडीची मोट बांधत सत्ता संपादन केली होती. त्याला शिवसेनेचीही साथ मिळाली.

नगरसेवक सांभाळण्यासाठी महापौरपदाचे तुकडे पाडून कोल्हापुरात दर तीन किंवा सहा महिन्याला महापौर बदलला जात आहे. सुरमंजिरी लाटकर यांना केवळ दोन महिनेच महापौरपद अनुभवायला मिळालं. काही महिन्यांनी होणाऱ्या बदलामुळे पदाची प्रतिष्ठा राखली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होते.

महापालिकेत महिलाराज

गेल्या दहा वर्षात अनुसूचित जाती, सर्वसाधारण, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेलं कोल्हापूरचा महापौरपद पुन्हा एकदा ओबीसी महिलांसाठी आरक्षित झालं होतं. सलग चार आरक्षणे महिलांसाठी आरक्षित झाल्याने महापालिकेत पुन्हा एकदा महिलाराज आलं होतं. 13 नोव्हेंबरला झालेल्या आरक्षण सोडतीनंतर इच्छुक असलेल्या सर्वच प्रवर्गातील पुरुष वर्गाची निराशा झाली होती.

कोल्हापूर महापालिकेचा इतिहास 

  • 1978 मध्ये कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाली.
  • नारायण धोंडीराम जाधव हे कोल्हापूरचे पहिले महापौर होते.
  • 1978 पासून आतापर्यंत 49 महापौरांनी कार्य़भार सांभाळला
  • गेल्या 10 वर्षात 15 महापौर करवीरवासियांनी पाहिले
  • 2018 पासून आतापर्यंत तब्बल 5 महापौर बदलण्यात आले आहेत.
  • महापौरपदाबरोबरच आता स्थायी समिती सभापतीपदाच्या खांडोळीचाही प्रघात मागच्या वर्षीपासून पडला आहे.

Kolhapur Mayor Resign