
राज्यातील जनतेला आणि राजकीय पक्षांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे वेध लागले आहेत. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 31 जानेवारी पर्यंत या निवडणुका पार पाडाव्यात असे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. मात्र अजूनही निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. अशातच आता पुढील काही दिवसांमध्ये निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
गेल्या काही काळापासून महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आढवड्यात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 5 किंवा 6 तारखेला वेळापत्रक जाहीर होऊ शकतं. यानंतर लगेच आचारसंहिता लागणार आहे. तसेच या निवडणुका 3 टप्प्यात होणार असल्याचे आणि मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. मात्र या निवडणुकींच्या तारखा कधी जाहीर केल्या जातील याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकां निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहे. या तारखा जाही करताना त्यांनी कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले की, ‘मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. पण आमच्याकडील माहितीनुसार 5 नोव्हेंबर ला नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक जाहीर होतील तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदान होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणूका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणूका जाहीर होऊन 15 जानेवारीला मतदान होईल आणि 31 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील.’ मंचर येथे युवक-युवती मेळाव्यात बोलताना वळसे पाटलांनी ही माहिती दिली आहे.