मित्रपक्षांचं जागावाटप ठरण्याआधी महादेव जानकरांचे उमेदवार निश्चित

| Updated on: Oct 01, 2019 | 1:47 PM

पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातून राहुल कुल आणि परभणीतील जिंतूर मतदारसंघातून मेघना बोर्डीकर यांना महादेव जानकरांनी रासपचं तिकीट जाहीर केलं आहे.

मित्रपक्षांचं जागावाटप ठरण्याआधी महादेव जानकरांचे उमेदवार निश्चित
Follow us on

मुंबई : शिवसेना-भाजप-रासप-रिपाइं-शिवसंग्राम यांची युती जाहीर झाली आहे. भाजप 146, शिवसेना 124 तर मित्रपक्ष 18 जागा लढवणार आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार, हे माहित नसतानाच अध्यक्ष महादेव जानकर यांनी उमेदवार (Mahadev Jankar RSP Candidate) जाहीर केले आहेत. राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर यांना तिकीट देण्यात आलं आहे.

भाजपच्या कोट्यातून मित्रपक्षांना जागा मिळणार असल्यामुळे या पक्षांनी ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह धरण्यात येत आहे. महादेव जानकर मात्र तो धुडकावत ‘रासप’च्याच चिन्हावर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातून राहुल कुल यांना पुन्हा एकदा उमेदवारी (Mahadev Jankar RSP Candidate) देण्यात आली आहे. राहुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणुकीला उतरवण्यात आलं होतं. बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्या मैदानात होत्या.

परभणी जिल्ह्यातील जिंतूरमधून मेघना बोर्डीकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. मेघना या माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या आहेत. मेघना बोर्डीकरांना लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावण्याची इच्छा होती, मात्र त्यावेळी त्यांना संधी मिळाली नव्हती. आता विधानसभा निवडणुकीत त्या रिंगणात उतरणार आहेत.

BJP Candidate List | भाजपची पहिली यादी जाहीर

मी युतीत असलो, तरी माझ्या चिन्हावर लढण्यावर ठाम आहे. फलटण आणि तुळजापूर हे मतदारसंघ मिळावेत, ही आपली मागणी असल्याचं महादेव जानकर म्हणाले.

गेल्याच महिन्यात महादेव जानकर यांनी अभिनेता संजय दत्त आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याची पुडी सोडली होती. संजय दत्त रासपच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्येच पक्षप्रवेश करणार होता, मात्र आता त्याने सप्टेंबर महिन्याची तारीख दिली आहे, असा दावा त्यावेळी जानकरांनी केला होता. परंतु आपण कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होणार नसल्याचं त्यावेळी संजय दत्तने स्पष्ट केलं होतं.