प्रस्तावित मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागरांच्या नावावर शिक्कामोर्तब?

| Updated on: Jun 12, 2019 | 8:01 PM

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी 'मातोश्री'वर शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि सुभाष देसाई यांच्याशी चर्चा केली.

प्रस्तावित मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागरांच्या नावावर शिक्कामोर्तब?
Follow us on

मुंबई : प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेत अस्वस्थता असल्याचं दिसतंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत मंत्र्यांकडे चाचपणी केली. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ‘मातोश्री’वर शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि सुभाष देसाई यांच्याशी चर्चा केली. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून राज्यात एखादे महत्वाचे पद दिले गेल्यास काय करावे याबाबत ही चाचपणी असल्याचं कळतंय.

उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास सुभाष देसाई यांचं नाव आघाडीवर आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले बीडमधील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची थेट कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे पक्षांतंर्गत अस्वस्थता वाढल्याचं चित्र आहे.

शिवसेना मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील सूत्र दावा करत आहेत की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवसेना नेतृत्त्वाला अधिकृतपणे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही कळवण्यात आलेलं नाही. पण भाजपच्या वरिष्ठ स्तरावरील सूत्रांचा दावा आहे की, मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यात शिवसेना सहभागी होईल.

दरम्यान, शिवसेना तीन महिन्यांसाठी उपमुख्यमंत्रीपद घेणार नाही, असं यापूर्वी समोर आलं होतं. भाजपच्या कोअर कमिटीची नुकतीच दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्त्वात बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. याच भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातं.

यावेळी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या काही नवख्या चेहऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. यामध्ये काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचाही भाजप प्रवेश अजून वेटिंगवर आहे, शिवाय रणजितसिंह मोहिते पाटलांच्याही नावाची चर्चा आहे. सध्याच्या काही मंत्र्यांना पक्ष संघटन करण्यासाठी लावलं जाऊ शकतं, असंही बोललं जातंय.