Gram Panchayat Election Results 2021: गावगाड्यावर कुणाची सत्ता, कोण होणार पायउतार? थोड्याच वेळात निकाल

| Updated on: Jan 18, 2021 | 7:07 AM

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडलंय, तर थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Gram Panchayat Election Results 2021: गावगाड्यावर कुणाची सत्ता, कोण होणार पायउतार? थोड्याच वेळात निकाल
Follow us on

मुंबई : एकवेळ राज्याचं राजकारण सोपं पण गावगाड्याचं राजकारण अवघड असं म्हटलं जातं. तर याच गावगाड्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज आहे. थोड्याच वेळात निकाल जाहीर होणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाचं चित्र पूर्णपणे पालटल्यानंतर आता गावखेड्यातील राजकीय परिस्थितीकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणूक निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे डोळे लागले आहेत.(The Gram Panchayat election results will start shortly)

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडलंय, तर थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 34 जिल्ह्यांमधील एकूण 14 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभावक्षेत्रातील ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यावर भर दिला. त्यासाठी लाखोंची बक्षिसंही जाहीर करण्यात आली. त्यामुळे अनेक ग्रामपंचायत निवडणुका या बिनविरोध पार पडल्या आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे. कोणत्या पक्षाच्या किती ग्रामपंचायती येतात यावर आगामी महापालिका आणि त्यापुढील निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायत निवडणुका?

ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. अशाप्रकारे राज्यात एकूण 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलंय.

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा

निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
एकूण प्रभाग- 46,921
एकूण जागा- 1,25,709
प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

संबंधित बातम्या :

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Date : काऊंटडाऊन सुरू, लवकरच निकालाची प्रतीक्षा संपणार

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

The Gram Panchayat election results will start shortly