एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने महायुतीतलं वादळ थोपवलं, रायगडमध्ये जुईली दळवी उमेदवारी अर्ज मागे घेणार?

महायुतीचा नियम पाळला पाहिजे अश्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे आमदार महेंद्र दळवी आपल्या मुलीचा या निवडणुकीतील अर्ज माघारी घेणार असे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने महायुतीतलं वादळ थोपवलं, रायगडमध्ये जुईली दळवी उमेदवारी अर्ज मागे घेणार?
eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2026 | 7:28 PM

Raigad Vidhan Parishad Election : राज्यात विधानपरिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण भारलेले आहे. या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अनेक जागांवर बंडखोरी झालेली आहे. काही ठिकाणी तर काहीही झालं तरी आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असा पवित्रा काही बंडखोरांनी घेतला आहे. महायुतीत रायगडच्या जागेवरूनही धुसफूस पाहायला मिळली. या जागेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रायगडची जागा राष्ट्रवादीला सुटलेली असूनही तेथे शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. दरम्यान, आता याच महायुतीतील पेचावर एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जाणारे मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने तोडगा निघाल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जुईली दळवी या लवकरच आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार कोकणातील विधानपरिषदेच्या निवडणुकीतील बंडखोरी शमली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात एक्सप्रेस टॉवरमध्ये कोकणातील शिंदेंच्या शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी देखील बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.कोकणात महायुती मधून अनिकेत तटकरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर महायुतीचा नियम पाळला पाहिजे अश्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आमदार महेंद्र दळवी आपल्या मुलीचा या निवडणुकीतील अर्ज माघारी घेणार आहेत, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळणार

दरम्यान, काहीही झालं तरी या जागेवर रायगडच्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असावा, अशी मागणी मंत्री भरत गोगावले यांच्याकडून केली जात होती. या जागेवर ते त्यांच्या मुलासाठीदेखील प्रयत्न करत होते. जागा मिळत नसल्याचे समजताच त्यांनी तटकरे कुटुंबाला उमेदवारी मिळत असेल तर शिवसेनेला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी मागणी गोगावले यांनी केली आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us