मानोरा तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार, 2 जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते भाजपात

| Updated on: Sep 08, 2019 | 11:33 PM

राज्यभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीची (NCP) साथ सोडत भाजपचा (BJP) मार्ग धरला आहे. त्यामुळे खिळखिळ्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता मानोरा (Manora) तालुक्यातही मोठं खिंडार पडलं आहे.

मानोरा तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार, 2 जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते भाजपात
Follow us on

वाशिम: राज्यभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीची (NCP) साथ सोडत भाजपचा (BJP) मार्ग धरला आहे. त्यामुळे खिळखिळ्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता मानोरा (Manora) तालुक्यातही मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे (Subhash Thakare) यांचे खंदे समर्थक उमेश पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष देवनाथ भोयर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. राष्ट्रवादी पक्षात मक्तेदारी आणि हुकुमशाही वाढत असल्याचा आरोप संबंधित पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच याला कंटाळूनच आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचंही त्यांनी सांगितलं.

कारंजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी आणि ठाकरे पितापूत्रांसाठी हे पक्षांतर मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षांतराने कारंजा विधानसभा मतदारसंघात घड्याळाची टिकटिक मंदावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका निभावणारे अनेक बिणीचे शिलेदार पक्षाला रामराम ठोकत आहेत. राज्यातील हे लोण आता वाशिम जिल्ह्यातही पसरले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षात घराणेशाही सुरू असल्याचा आणि तुसडेपणाची वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे.

माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांचे खंदे समर्थक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक उमेश पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष देवनाथ भोयर यांच्यासह तालुक्यातील बहुतांश धुरिणांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पुढाकारात भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये शेतकरी सुतगिरणी दारव्हाचे संचालक विठोबा पाटील, पंचायत समितीचे सदस्य गजानन भवाने, कुपट्याचे सरपंच रवी दिघडे, जवळ्याचे माजी सरपंच नरेंद्र पाटील, कोलारचे माजी उपसरपंच विनोद पाटील, हिवरा बु. येथील सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य गोपाल पाटील, सचिन घोडे आदींचा समावेश आहे.

एकेकाळी ठाकरे कुटूंबाचे अत्यंत विश्वासू असलेल्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत पक्षाला याचा फटका बसेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.