विनायक मेटे आक्रमक; 36 जिल्ह्यात मेळावे, मुंबईत 10 हजार बाईकची रॅली, पावसाळी अधिवेशावरही आंदोलनाचा इशारा

| Updated on: Jun 14, 2021 | 6:06 PM

मराठा आरक्षणाबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी सध्या आपण दौऱ्यावर आहोत. 26 जूनला औरंगाबादेत मेळावा घेणार असल्याचं मेटे यांनी सांगितलं.

विनायक मेटे आक्रमक; 36 जिल्ह्यात मेळावे, मुंबईत 10 हजार बाईकची रॅली, पावसाळी अधिवेशावरही आंदोलनाचा इशारा
विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम संघटना
Follow us on

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण अधिक तापताना पाहायला मिळत आहे. 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन केल्यानंतर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा आज स्पष्ट केली. यावेळी त्यांनी 36 जिल्ह्यात मेळावे घेणार असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर 26 जूनरोजी औरंगाबादेत मेळावा, 27 जून रोजी मुंबईत 10 हजार बाईकची रॅली काढण्याची घोषणा केलीय. इतकंच नाही तर 7 जुलैला होणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय. (Vinayak Mete warns Thackeray government over Maratha reservation)

5 जून रोजी बीडमधून मराठा आंदोलनाला सुरुवात करण्यात आलीय. मराठा आरक्षणाबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी सध्या आपण दौऱ्यावर आहोत. 26 जूनला औरंगाबादेत मेळावा घेणार असल्याचं मेटे यांनी सांगितलं. तसंच 36 जिल्ह्यात आपण मेळावे घेणार आहोत. विभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. 27 जून रोजी मुंबईत तब्बल 10 हजार बाईकची रॅली काढण्यात येणार आहे. 5 जुलैपर्यंत मराठा समाजाचे प्रश्न सुटले नाहीत तर 7 जुलैचं पावसाळी अधिवेशन रोखण्याचा इशाराही मेटे यांनी यावेळी दिलाय.

नक्षलवाद्यांचं ‘ते’ पत्रक राज्य सरकारसाठी धोक्याची घंटा

नक्षलवाद्यांनी मराठा समाजाला पाठिंब्याचं दिलेलं पत्र हे राज्य सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. नक्षलवाद्यांच्या सहानुभूतीच्या जाळ्यात मराठा समाजातील पिचलेले तरुण सापडले तर सामाजिक दृष्टीनं महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान होईल. अशावेळी नक्षलवाद्यांनी काढलेल्या पत्रकाबाबत सरकारकडून एकही प्रतिक्रिया येत नाही हे दुर्दैव असल्याची टीकाही मेटे यांनी केलीय.

‘अशोक चव्हाणांना हाकलेपर्यंत आंदोलन थांबणार नाही’

काँग्रेसच्या मनात मराठा समाजाबद्दल जी गरळ आहे ती काढायची झाल्यास अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा. त्यांना हाकलेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, अशी घोषणाच मेटे यांनी बीडमधून केली होती. मराठा समाज्याच्या मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारने 3 दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल केली. पण महिना उलटून गेला तर राज्य सरकारने काहीही केलं नाही, अशी टीका करताना तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करा, अशी मागणी मेटे यांनी केली होती.

‘ठाकरे सरकारला लाथा घालण्यासाठी आता पुढे या’

मराठा समाजाला EWS (आर्थिक दुर्बल घटक) आरक्षणाचा निर्णयही आपण मराठा मोर्चा जाहीर केल्यावर घेतला गेला. त्यासाठी मी कोर्टात गेल्यानंतर सरकारनं आपल्याला EWS आरक्षण दिलं. त्यामुळे या सरकारला लाथा घातल्याशिवाय यांना जाग येत नाही हे आता सिद्ध झालंय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला लाथा घालण्यासाठी आता पुढे या असं आवाहनही मेटे यांनी केलंय. ही फक्त सुरुवात आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरुच राहील. मराठा समाजातील आमदारांना जर चाड असेल तर ते या आंदोलनाच्या मागे उभा राहतील, असं आवाहनही मेटे यांनी केलं बीडमधून केलं होतं.

संबंधित बातम्या :

दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, उदयनराजे आणि माझं सर्वच मुद्द्यांवर एकमत: संभाजी छत्रपती

उद्रेक झाला तर जबाबदार कोण?, कोर्ट कचेऱ्यांवर विश्वास नाही: उदयनराजे भोसले

Vinayak Mete warns Thackeray government over Maratha reservation